नागपूर महानगरपालिकेत येणार १०० टक्के महिलाराज, सर्व समितांच्या अध्यक्षपदी मातृशक्ती
By योगेश पांडे | Updated: February 24, 2026 00:14 IST2026-02-24T00:13:53+5:302026-02-24T00:14:16+5:30
मुख्यमंत्री, गडकरींकडून हिरवी झेंडी: विरोधकांनादेखील महिलांनाच संधी देण्याचे आवाहन

नागपूर महानगरपालिकेत येणार १०० टक्के महिलाराज, सर्व समितांच्या अध्यक्षपदी मातृशक्ती
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासह विविध विशेष समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर मनपात ‘महिलाराज’ प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पक्षाने स्थायी समिती, परिवहन समिती आणि अन्य १० विविध विशेष समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विरोधकांनादेखील महिलांनाच संधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर असे झाले तर असा पुढाकार घेणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरू शकेल.
भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडली. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारातून प्रेरणा घेत नागपूर महानगरपालिकेतही महिलांना पूर्ण नेतृत्व देण्याचा विचार पुढे आला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व स्तरांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत नागपूर महानगरपालिकेतील सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांनाच संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार स्थायी समिती, परिवहन समिती तसेच इतर सर्व समित्यांचे अध्यक्षपद महिलांकडेच असेल. एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या दहा झोनच्या सभापतीपदीदेखील महिलांचीच नियुक्ती केली जाणार आहे. प्रशासनात महिलांचे नेतृत्व मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपने शंभर टक्के महिलांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका देशातील महिलांच्या पूर्ण नेतृत्वाखाली चालणारी पहिली महानगरपालिका ठरेल असे तिवारी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस, एमआयएम, मुस्लिम लीगलादेखील आवाहन
दरम्यान, काँग्रेसच्या वाट्याला स्थायी समितीतील चार जागा आल्या असून, त्या जागांवरही महिलांनाच संधी देण्याचे भाजपकडून आवाहन करम्यात आले आहे. तसेच एमआयएम आणि मुस्लिम लीगनेही महिलांना संधी देत या ऐतिहासिक निर्णयात सहभागी व्हावे, तिवारी म्हणाले.