Birth Centennial Special: One of Babasaheb's Navratna Ratna Panchabhai | जन्मशताब्दी विशेष : बाबासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न पंचभाई
जन्मशताब्दी विशेष : बाबासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न पंचभाई

ठळक मुद्देधम्मदीक्षा सोहळ्याचे केले व्यवस्थापन : बौद्ध आचरण शिकविण्यासाठी दिले आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पण त्यानंतर दोनच महिन्यात त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे त्यांना या महान धम्माबाबत शिक्षित करण्याची संधीच मिळाली नाही. हे काम अतिशय सक्षम आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांमध्ये पिताजी ऊर्फ मा.डो. पंचभाई या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करणे अत्यावश्यक ठरते. डॉ. बाबासाहेब ज्या सहकाऱ्यांना नवरत्न मानत त्यापैकी एक म्हणजे मा. डो. होते. त्यांनी बौद्धांना धम्माचे आचरण शिकविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.
पंचभाई यांच्या मार्गदर्शनात शिकलेले व त्यानुसार कार्य करणारे उमेश गजभिये यांनी आंबेडकरी बौद्ध चळवळतर्फे आयोजित जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात पंचभाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९५६ साली नागपुरातील धम्मदीक्षा सोहळ्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्यात मा. डो. हे अग्रस्थानी होती. धम्मदीक्षा आयोजन समितीचे सचिव व सोहळ्याचे व्यवस्थापक म्हणून आपली जबाबदारी नेटाने पार पाडली होती. २२ ऑक्टोबर १९१९ साली जन्मलेले पंचभाई यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून १९४२ च्या ब्रिटिशांविरोधातील चले जावो आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या चळवळीत सक्रियपणे उडी घेतली ती आयुष्याच्या शेवटपर्यंत. १९४५ नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन व समता सैनिक दलाचे कार्य सांभाळले. याच काळात त्यांनी संस्कृत आणि पाली भाषेचा गहन अभ्यास करून त्यात विद्वत्ता प्राप्त केली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी १९५५ मध्ये बौद्ध पूजापाठ पद्धतीबाबत जे लेखन केले, तपासण्याची जबाबदारी त्यांनी मा.डो. यांच्यावर सोपविली होती. संस्कृत व पालीसह बुद्धाच्या त्रिपिटकाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. महापंडित राहुल सांस्कृत्यायन, धर्मानंद कोसंबी यांच्यासारख्या विद्वानानंतर मा.डो. यांचा उल्लेख होतो. जगभरातील या विषयावरील अभ्यासकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य पंचभाई यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी यांच्याविरोधात घेतलेली त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. दीक्षाभूमीवर चालणाऱ्या राजकीय गोष्टींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘दीक्षाभूमी हे राजकीय उपयोगाचे ठिकाण नसून धर्मभूमी आहे’, असा आदेश त्यांनी १९८७ साली सर्वोच्च न्यायालयाकडून मिळवून घेतल्याचे गजभिये यांनी नमूद केले.
बौद्ध आचरण शिकविण्यासाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले. ‘बौद्ध आचरण ही सायकोथेरेपी आहे’, असे ते मानत व ते शिकविण्यासाठी त्यांनी अनेक लहान लहान पुस्तकांचे लेखन केले. पीएचडीचे विद्यार्थी राहुल व अभ्यासक राहुल गुढे यांनी पंचभाई यांच्या पुस्तकांचे विश्लेषण केले. मा.डो. बौद्ध धम्म जगले, आचरले आणि इतरांनाही शिकविले. ‘पुनर्जन्म एक वेडगळ कल्पना ’, मनावर ताबा मिळविण्याचे मार्गदर्शन करणारे ‘चित्त राजा मन प्रधान’, तरुणांना व लोकांनाही भेडसावणाऱ्या प्रश्नांचे उत्तर देणारे ‘सुख लो सुख’, ‘भुकेशिवाय कोणतीही इच्छा नैसर्गिक नाही’ तसेच बुद्धाच्या त्रिपिटकावर आधारित ‘पतीप्त समुत्पाद’ या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदी व मराठी या तिन्ही भाषेत लेखन करून जगभरात पोहचविले. पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी या पुस्तकासह महास्थवीर चंद्रमणी यांच्या चरित्राचा मराठी अनुवाद त्यांनी केला. पंचभाई यांच्या योगदानावर समता सैनिक दलाचे मार्गदर्शक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांनीही प्रकाश टाकला.

 


Web Title: Birth Centennial Special: One of Babasaheb's Navratna Ratna Panchabhai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.