जगदीश जोशी
नागपूर : जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये सत्संग आयोजनावर उडवले. सोसायटीचा अध्यक्ष खेमचंद मेहरकुरेने एका आध्यात्मिक गुरूच्या सत्संगाचा पाच वर्षांपर्यंत खर्च उचलला होता. प्रत्येक आयोजनावर एक कोटी रुपयावर रक्कम खर्च झाली. लोकमतने केलेल्या चौकशीतून ही माहिती पुढे आली.
आर्थिक गुन्हे शाखेने सोसायटीतील ८६ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात खेमचंद मेहरकुरे, त्याचा मुलगा अभिषेक, योगेश चरडे, कुश कावरे, अशोक दुरगुडे व अर्चना टेके यांना अटक केली आहे. या घोटाळ्यासंदर्भात लोकमतने २३ नोव्हेंबर रोजी बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक मीना जगताप यांच्याकडे घोटाळ्याचा तपास सोपविण्यात आला. मेहरकुरे एका मोठ्या आध्यात्मिक गुरूशी जुळला आहे. त्या गुरूचा अमरावती मार्गावर आश्रम आहे. त्या गुरूचा अनेक वर्षांपासून नागपूरमध्ये सत्संग कार्यक्रम आयोजित केला जातो. सुरुवातीला एका मोठ्या मद्य व्यावसायिकाद्वारे त्या गुरूचा कार्यक्रम घेतला जात होता. दरम्यान, मेहरकुरेने स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी त्या कार्यक्रमाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्याची इच्छा पूर्ण करण्यात आली.
हा कार्यक्रम भव्य असतो. आयोजन समितीमध्ये २५ वर व्यक्तींचा समावेश असतो. आध्यात्मिक गुरू व त्यांच्या सहकाऱ्यांची विमान तिकिटे, निवास, भोजन, सत्संग आयोजन इत्यादी खर्च यजमानांना करावा लागतो. कार्यक्रमानंतर ‘गुरुदक्षिणा’ द्यावी लागते. या कार्यक्रमावर मेहरकुरेने पाच वर्षात कोट्यवधी रुपये उडवले. दरम्यान, मेहरकुरेला ‘गुरुभाई’ म्हणणे सुरू झाले. गुंतवणूकदारांना मेहरकुरेवर विश्वास बसला. ते सोसायटीत पैसे गुंतवायला लागले. त्यांना मेहरकुरे हा स्वत:च्या खर्चाने सत्संग आयोजित करतो असे वाटत होते. घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली. सोमवारी अभिषेक मेहरकुरे, योगेश चरडे, कुश कावरे, अशोक दुरगुडे व अर्चना टेके यांना न्यायालयात हजर करून त्यांची ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली.
------------
आध्यात्मिक गुरूसाठी कार खरेदी
खेमचंद मेहरकुरेने आध्यात्मिक गुरूसोबत जुळल्यानंतर पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्याने गुरूकरिता ३० लाख रुपयांची लक्झरी कार खरेदी केली असे सांगितले जाते. आध्यात्मिक गुरू हे मेहरकुरेच्या शिवनगरस्थित घरी थांबत होते. तेथून कारने कार्यक्रमस्थळी जात हाेते. सत्संग संपल्यानंतर गुरूला किमती भेटवस्तू दिल्या जात होत्या. त्याची माहिती अद्याप पुढे आली नाही. गुरू व त्यांचे सहकारी विशिष्ट कंपनीचे पाणी पीत होते. त्यावरच हजारो रुपये खर्च होत होते. घोटाळा पुढे आल्यानंतर अनेकांनी आध्यात्मिक गुरूची भेट घेतली, पण गुरूंनी मेहरकुरेला ओळखण्यास नकार दिला. यापूर्वीही अनेक घोटाळेबाजांनी आध्यात्मिक गुरूच्या सत्संगावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.