बोगस पद भरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 21:50 IST2022-05-16T21:48:53+5:302022-05-16T21:50:14+5:30
Nagpur News वेकोलि, एसबीआय आणि रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी भंडाफोड केला आहे.

बोगस पद भरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड
नागपूर : वेकोलि, एसबीआय आणि रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या टोळीने नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या टोळीतील शिल्पा राजीव पालपर्ती, कुंदन कुमार ऊर्फ राहुल सिंग ऊर्फ रमेश शर्मा (३४, पाटणा), मोहम्मद दानिश झिशान आलम ऊर्फ रशीद अन्वर आलम (३५, रा. पाटणा, सुलतानगंज) यांना अटक करण्यात आली आहे. परंतु अद्यापही मुख्य सूत्रधार हाती लागलेला नाही.
सोमवारी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विजय मगर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र निकम यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. सावनेर येथील खुरजगाव येथील सतीश प्रकाश आडे (३०) यांच्या तक्रारीनुसार २६ जुलै २०२१ रोजी आरोपी अमित कोवे, शिल्पा पालपर्ती आणि रमेश कामोने यांनी वेकोलि किंवा एसबीआय बँकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नीची ११ लाख १७ हजारांची फसवणूक केली. त्यानंतर केळवद पोलिसांनी १ जानेवारी २०२२ रोजी आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सुरेंद्रगड येथील रहिवासी व आरोपी अमित कोवे याने जानेवारी २०२२ मध्ये धंतोली येथील पत्रकार भवनाजवळ विष पिऊन आत्महत्या केली होती. मोबाईलचा तपास केला असता, त्याने नागपूर शहरासह ग्रामीण, गोंदिया, भंडारा, अमरावती, वर्धा येथील अनेक तरुणांकडून नोकरीसाठी लाखो रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच २०१९ पासून पाटणा येथील कुंदन व मोहम्मद दानिशला १ कोटी ३० लाखांची रक्कम दिल्याची माहितीदेखील समोर आली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून सावनेर न्यायालयात हजर केले असता, १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी महिला शिल्पाविरुद्ध हुडकेश्वर, नांदेडमधील शिवाजीनगर आणि सांगलीतील मिरज पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मगर यांनी, आरोपींना बळी पडलेल्या नागरिकांनी ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोवे होता सामाजिक कार्यकर्ता
या प्रकरणातील आरोपी कोवे याच्या व्हायरल झालेल्या सुसाईड नोटनुसार, ही टोळी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना टार्गेट करून वेकोलि, रेल्वे आणि एसबीआय बँकेत नोकरी मिळवून देण्याचे दावे करायची. या टोळीचे जाळे नागपूर, विदर्भासह पाटण्यापर्यंत पसरल्याची माहिती सुसाईड नोटमध्ये आढळून आली. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अमित कोवेला आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यादरम्यान, संबंधीत टोळीने कोवेला त्यांच्यात समाविष्ट केले असल्याची चर्चा आहे. कोवेने आपल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी रशीद आलम (५०), कुंदन कुमार ऊर्फ राहुल सिंग (४५) यांच्यासह कथित रेल्वे अधिकारी तिवारी (५५), खुराना (५०), शिल्पा पालपर्ती (४०), गडचिरोलीतील तुपट (४५), सकतेल (४५), नागपुरे (४५), कोचे (३५) यांची नावे नमूद केली होती.