बोलीभाषेचा तौलनिक अभ्यास व्हावा

By Admin | Updated: January 15, 2015 00:59 IST2015-01-15T00:59:33+5:302015-01-15T00:59:33+5:30

वऱ्हाडी, नागपुरी व झाडी बोलीचे सौंदर्य आहे. या बोलींचा तौलनिक अभ्यास व्हावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी बुधवारी केले.

Bilingual study should be done | बोलीभाषेचा तौलनिक अभ्यास व्हावा

बोलीभाषेचा तौलनिक अभ्यास व्हावा

न्या. विकास सिरपूरकर : विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन समारंभ
नागपूर : वऱ्हाडी, नागपुरी व झाडी बोलीचे सौंदर्य आहे. या बोलींचा तौलनिक अभ्यास व्हावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी बुधवारी केले. विदर्भ साहित्य संघाचा ९२ वा वर्धापनदिन समारंभ आणि वाड्मय पुरस्कार -वितरण सोहळ्यानिमित्त संघाच्या सांस्कृतिक संकुलात आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर,संघाचे उपाध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम व वामन तेलंग आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृती कमी होत आहे, ती वाढली पाहिजे, वाचणार नाही तर वाचाल कसे. यासाठी लोकांत वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी विदर्भ साहित्य संघाने उपक्रम राबवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी प्रस्ताविकातून विदर्भ साहित्य संघाच्या गौरवशाली वाटचालीवर प्रकाश टाकला. संघाच्या माध्यमातून सर्व प्रवाहांना व्यासपीठ मिळाले. विदर्भाची संस्कृती बहुभाषिक आहे. सामजिक, भाषिक सलोखा राखण्यात संघाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोहर म्हैसाळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनीही विचार मांडले. संचालन शुभदा फडणवीस यांनी तर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ंसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण
वाङ्मय पुरस्काराचे सिरपूरकर यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यात चंद्रकांत ढाकुलकर यांना हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता, डॉ. महेंद्र भवरे यांना पां.ब. गाडगीळ स्मृती युगवाणी लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विजय कुवळेकर यांच्याहस्ते डॉ. भारती सुदामे यांना पु.य.देशपांडे स्मृती कादंबरीलेखन, डॉ. संध्या अमृते यांना कुसुमानिल स्मृती समीक्षालेखन, नेहा भांडारकर यांना वा. कृ.चोरघडे स्मृती कथालेखन, डॉ. तीर्थराज कापगते यांना शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्यलेखन, सदानंद सिनगारे यांना गो.रा.दोडके स्मृती ललितलेखन, प्रसन्न शेंबेकर व लोकमत नागपूर आवृत्तीच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना नवोदित साहित्य लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
मिलिंद बोकील यांना शांताराम कथा, के तन पिंपळापुरे यांना ना.रा.शेंडे जन्शताब्दी विशेष साहित्य तर प्रा. म.शं.वाबगावकर यांना डॉ. मा.गो.देशमुख स्मृती साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)
वैचारिक उदारमतवाद संपतोय
मूल्यासाठी मोल मोजण्याची तयारी असेल तरच वैचारिकता प्राप्त होते. परंतु आज वैचारिक उदारमतवाद संपतोय, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले. पदावर असल्याने माणूस शहाणा होत नाही. तो अभ्यासाने मोठा होतो. म्हणून आयुष्यात सतत शिकत राहिले पाहिजे. प्रसिद्धीच्या झगमगाटामागे धावणारे आहेत. परंतु यातून मिळणारी प्रसिद्धी फार काळ टिकत नाही, असेही ते म्हणाले.
९२ वा वर्धापनदिन
विदर्भ साहित्य संघाच्या गौरवशाली वाटचालीची ९१ वर्षे पूर्ण झाली असून ९२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त आयोजित वर्धापनदिन समारंभात वाङ्मय पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. के.ज.पुरोहित यांना जीवनव्रती पुरस्कार जाहीर करण्यात आला. परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.

Web Title: Bilingual study should be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.