नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाण्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 07:48 PM2017-12-23T19:48:25+5:302017-12-23T19:52:05+5:30

पोलिसांनी केवळ स्मार्ट दिसून चालणार नाही तर त्यांचे कामही स्मार्टपणे व्हायला हवे आणि त्यासाठी पोलिसांनी लोकाभिमुख व्हायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

Bhumipujan of the first smart police station in the hands of Chief Minister Phadnavis in Nagpur at the hands of Nagpur | नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाण्याचे भूमिपूजन

नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाण्याचे भूमिपूजन

googlenewsNext
ठळक मुद्देनिवासी तसेच व्यावसयिक संकुलाचीही निर्मितीपोलिसांना लोकाभिमुख होण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
नागपूर :
देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाणे आणि निवासी तसेच व्यावसयिक संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते शनिवारी दुपारी झाले. त्यानिमित्ताने लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लकडगंज पोलीस ठाणे सर्वाधिक स्मार्ट होणार आहे, मात्र येथील कामही स्मार्ट व्हायला पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी मनुष्यबळातही चांगल्यात चांगली कामगिरी बजावू शकतो, याची प्रचिती नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्तातून मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील विविध ठिकाणांहून येथे बंदोबस्तासाठी पोलीस बोलविण्यात येत होते. मात्र, यंदा तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस आयुक्तांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत बंदोबस्ताला ३८ टक्के मनुष्यबळ कमी वापरले. या आणि अन्य काही उपक्रमांच्या माध्यमातून नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित केल्याबद्दल तसेच अनेक चांगले उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले.

स्मार्ट टाऊनशिप
राज्याचे गृहमंत्रालय हाती घेतल्यानंतर लक्षात आले की, अनेक ठिकाणचे पोलीस शिवकालीन आणि शाहूकालीन इमारतीत राहतात. मुंबईत अनेक पोलीस झोपडपट्टीत राहतात. कारण ४० वर्षांमध्ये पोलीस भरती झाली तरी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याकडे लक्ष दिले गेले नाही. राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरांची आवश्यकता असल्याचे ध्यानात आले. त्यापैकी सरकारने ४७ हजार घर बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी तीन हजार घरांचे बांधकाम सुरू झाले असून, सात हजार घरांचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.  नागपुरातील हा प्रकल्प मॉडेल ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे बांधकामही मॉडेल ठरावे, अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली.
पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांच्या घर उभारणीसाठी अडीचपट एसएफआय वाढवून देऊ आणि वेतनाच्या बेसिकच्या २०० पट व्याजमुक्त कर्ज देण्यात येईल, असेही ते म्हणाले. सरकार हे करीत आहे. मात्र, पोलिसांनीही त्यांच्या कामात गुणात्मक दर्जा वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रारंभी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी वर्षभरात नागपूर पोलिसांनी राबविलेल्या समाजाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक करताना आ. खोपडे यांनी आपल्या मतदार संघात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी पूर्व नागपुरात विकासच होत नव्हता. आता मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून केवळ तीन वर्षांत आपल्या मतदार संघात सहा हजार कोटींची विकास कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी विशेष योगदान देणारे श्याम वर्धने (नासुप्रचे तत्कालीन सभापती), अभियंता सुनील गुज्जलवार आणि तंत्रज्ञ तौफिक सिद्दीकी यांचा कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे रंगतदार संचालन पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले. त्यांनी ऐकविलेल्या शेरोशायरीला मंचावरील उपस्थितांसह मुख्यमंत्र्यांनीही अनेकदा दाद दिली. आभारप्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंडे यांनी केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
पाच एकरात ११ माळ्यांचे बांधकाम. पोलीस ठाणे, सहायक आयुक्त आणि उपायुक्तांचे कार्यालय. संपूर्ण परिसरात वायफाय. पोलीस कर्मचारी, उपनिरीक्षक आणि निरीक्षकांचे निवासी संकुल. व्यावसायिक गाळेही बांधणार. क्लब हाऊस, जीम आणि आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाचीही व्यवस्था. ५०० लोकांची क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल. पहिले तीन माळे पार्किंगसाठी. बांधकामासाठी १०८ कोटींचा निधी तर कार्यालय फर्निचर आणि अन्य सुविधांसाठी ३६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर.

 

Web Title: Bhumipujan of the first smart police station in the hands of Chief Minister Phadnavis in Nagpur at the hands of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.