Bhumafia in Nagpur Jagadish Jaiswal arrested | नागपुरातील भूमाफिया जगदीश जयस्वाल गजाआड

नागपुरातील भूमाफिया जगदीश जयस्वाल गजाआड

ठळक मुद्देबनावट दस्तावेजाचा गैरवापर : वृद्धाची जमीन हडपण्याचा प्रयत्न अंगलट, मानकापूर पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वृद्ध मायलेकाच्या जुन्या तारखेतील मुद्रांकांवर (स्टॅम्प पेपर) सह्या घेऊन त्याआधारे त्यांची कोट्यवधींची जमीन हडपू पाहणाऱ्या एका भूमाफियाला मानकापूर पोलिसांनी अटक केली. जगदीशप्रसाद चंदनलाल जैस्वाल (वय ५०, रा. विठ्ठलनगर, बेसा) असे आरोपीचे नाव आहे. जयस्वाल हा जमिनीच्या कागदपत्रांच्या बनवेगिरीसाठी ओळखला जातो. भूमाफिया म्हणूनही जयस्वाल कुख्यात आहे. साथीदारांच्या माध्यमातून गरजूंना गाठायचे, त्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवायची, त्यांना जुजबी स्वरूपात रक्कम देऊन जुन्या तारखेतील स्टॅम्प पेपरवर त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि त्याआधारे करारनामा (बनावट दस्तावेज) तयार करून कोट्यवधींच्या जमिनी किरकोळ रकमेत हडपण्याचा प्रयत्न करायचा, असा जयस्वालचा गोरखधंदा आहे. स्वामी समर्थ नगरी बेसा चौकाजवळ राहणारे रुपराव साहेबराव कराळे (वय ६२) आणि त्यांच्या वृद्ध आईची कळमेश्वर भागात ९२ एकर जमीन आहे. ते पूर्वी मानकापुरात राहायचे. काही वर्षांपूर्वी कराळेंसोबत जयस्वाल यांची ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत जयस्वालने कराळेंच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवून जुन्या तारखेच्या स्टॅम्पपेपरवर कराळेंच्या नावे करारनामा तयार केला आणि त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर कराळे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी २० डिसेंबर २००८ ते ६ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या या प्रकरणाची सुमारे सात महिने चौकशी केल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात जगदीश जयस्वाल, त्याची पत्नी ममता जयस्वाल तसेच साथीदार रत्नाकर एस. गवई (वय ५२, रा. द्वारकापूरी रामेश्वरी अजनी) आणि नितीन रमनिकलाल सोनमोरे (वय ३८, रा. समाधाननगर, वडगाव, यवतमाळ) या चौघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शनिवारी सकाळी जयस्वालला पोलिसांनी अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करून त्याचा ४ दिवसांचा पीसीआर मिळवला.
अनेकांची फसवणूक
आरोपी जयस्वाल याने आपल्या साथीदाराच्या माध्यमातून अशाच प्रकारे अनेकांच्या जमिनी हडपण्याचे प्रयत्न चालविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. ठगबाज जयस्वालने बनावट कागदपत्रांच्या आधारे करारनामे करून अनेकांना कोर्टातही येरझारा मारण्यास बाध्य केल्याचे समजते. दरम्यान, त्याच्याकडून जमिनीच्या फसवणुकीसंदर्भातील अनेक प्रकरणांची माहिती उघड होऊ शकते, असा विश्वास ठाणेदार वजिर शेख यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Bhumafia in Nagpur Jagadish Jaiswal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.