भाट्येत तोतया कृषी अधिकारी जाळ्यात
By Admin | Updated: July 19, 2016 00:21 IST2016-07-18T22:53:58+5:302016-07-19T00:21:21+5:30
नागपूरच्या तरुणाला अटक : गुन्हा अन्वेषणची कारवाई

भाट्येत तोतया कृषी अधिकारी जाळ्यात
रत्नागिरी : शासकीय नोकर असल्याची बतावणी करून लोकांची व हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश मोहन दुधपचारे ऊर्फ बंजारी (वय २४, मकरढोकडा, ता. उमरेड, जि. नागपूर) या तोतया कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. त्याच्याकडील बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. इतर जिल्ह्यांतही त्याने काही हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे.
रत्नागिरीनजीकच्या भाट्ये येथे असलेल्या आनंद हॉटेलमध्ये एक संशयित राहण्यास आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. आपण कृषी अधिकारी म्हणून नागपूर येथे जिल्हा परिषदेत कार्यरत असल्याचे तो सांगत होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आनंद हॉटेल येथे छापा टाकून त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी प्रकाश दुधपचारे याने आपण कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत असून, आपण कृषी अधिकारी नसल्याचे कबूल केले. मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. त्यामुळे मी विविध ट्रॅव्हल्सच्या मालकांना भेटून कृषी अधिकारी असल्याचे सांगतो. शेतकऱ्यांना कोकणामध्ये मेळाव्यासाठी घेऊन जायचे आहे, असे सांगून गाड्या तसेच जेवणाचे कंत्राट तुम्हालाच देतो, असे सांगून त्यांच्याकडून झायलो गाडी, त्यासाठी लागणारा चालक आणि माहिती गोळा करण्यासाठी एक व्यवस्थापक घेत असल्याचे प्रकाशने पोलिसांसमोर कबूल केले.
पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील, पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहायक पोलिस निरीक्षक सुभाष माने, धर्मराज सावंत, संदीप कोळंबेकर, सुशील पंडित, संजय कांबळे, राकेश बागुल, उदय वाजे, मिलिंद कदम, अमोल भोसले, वैभव मोरे, गुरू महाडिक, चालक संजय जाधव, दत्ता कांबळे हे या कारवाईत सहभागी झाले होते. (वार्ताहर)
बनावट कागदपत्रांची जंत्रीच
प्रकाश राहत असलेल्या हॉटेलमधील खोलीची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर या नावाचे छापील लेटरहेड, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हा परिषद नागपूर अशा नावांचे वेगवेगळे दोन रबरी शिक्के, स्टॅम्पपॅड, तसेच जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद नागपूर या लेटरहेडवर रत्नागिरीतील विविध हॉटेल्सना दिलेली पत्रे, रत्नागिरीतील हॉटेल व्यवस्थापकांनी दिलेली संमतीपत्रे तसेच दौरा कार्यक्रम अशी बनावट कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.