भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान : पाच रुग्णांना मिळाले नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:47 IST2019-08-29T22:46:43+5:302019-08-29T22:47:50+5:30
बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून यकृत, दोन्ही मूत्रपिंड व नेत्रदान दान करून पाच रुग्णांना नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती हे शेतकरी होते, त्यातही त्यांच्या चार मुलींनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान : पाच रुग्णांना मिळाले नवजीवन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून यकृत, दोन्ही मूत्रपिंड व नेत्रदान दान करून पाच रुग्णांना नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती हे शेतकरी होते, त्यातही त्यांच्या चार मुलींनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
किसन पांडुरंग बनवडे (६२) रा. भंडारा असे अवयवदात्याचे नाव.
बनवडे यांची प्रकृती खालावल्याने लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला साथ न मिळाल्याने हॉस्पिटलचे डॉ. निलेश अग्रवाल यांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अग्रवाल, डॉ. आनंद संचेती व डॉ. निधीश मिश्रा यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाची माहिती दिली. बनवडे यांना चारही मुली आहेत. त्यांनी वडिलांचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत, त्या दु:खातही अवयवदानाला मंजुरी दिली. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे व समन्वयिका म्हणून वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पार पाडल्या. यामुळे यकृत व एक मूत्रपिंड न्यू ईरा हॉस्पिटल, एक मूत्रपिंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर महात्मे नेत्रपेढीला दोन्ही बुबुळ दान करण्यात आले.
३९ वे यकृत प्रत्यारोपण
नागपुरात २०१३ मध्ये मेंदू मृत व्यक्तीकडून अवयवदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत हे ९२ वे मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले तर यकृत प्रत्यारोपण ३९ वे होते. विशेष म्हणजे, लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमधील हे २५ वे यकृत प्रत्यारोपण झाले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सातवे ‘कॅडेव्हर’
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एका रुग्णाला एक मूत्रपिंड दान करण्यात आले. ‘ब्रेन डेड’व्यक्तीकडून मिळालेले हे सातवे ‘कॅडेव्हर’ ठरले. ही शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. जयंत निकोसे, डॉ. प्रतीक लढ्ढा, डॉ. निकेत, डॉ. सी.पी. बावनकुळे, डॉ. पी. किंमतकर, डॉ. विशाल रामटेके, डॉ. रितेश बन्सोड, डॉ. वंदना आदमने, डॉ. भोपळे, डॉ. योगेश झवर, डॉ. जयस्वाल व डॉ. मिराज शेख यांनी सहकार्य केले. न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये यकृताचे प्रत्यारोपण डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल व डॉ. सुशांत गुल्हाने यांनी केले तर मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. अमित देशपांडे, डॉ. रवी देशमुख व डॉ. रोहित गुप्ता यांनी केले. डॉ. निलेश अग्रवाल व डॉ. अर्चना संचेती यांच्या नेतृत्वात हॉस्पिटलच्या चमूंनी विशेष सहकार्य केले.