ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीगवर सट्टेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:55+5:302021-01-03T04:11:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लिगच्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या बुकीच्या अड्डयावर गुन्हे शाखेच्या ...

Betting on the Australian Big Bash League | ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीगवर सट्टेबाजी

ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीगवर सट्टेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लिगच्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या बुकीच्या अड्डयावर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी येथे क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करताना पंकज विष्णू थावराणी (वय ३४, रा. तुलसीनगर, शांतीनगर) हा एक बुकी पोलिसांना सापडला. या अड्ड्याचा सूत्रधार तन्नू ऊर्फ सुरेश चेलवानी आणि त्याचा साथीदार नवीन धर्मानी (रा. जरीपटका) हे दोन बुकी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जगात क्रिकेट, फुटबॉल सामने कुठेही सुरू असोत, नागपुरातील बुकी मात्र त्यावर खयवाडी, लगवाडी करतातच. सध्या ऑस्ट्रेिलयात बिग बॅश लीग सुरू आहे. या सामन्यावर कुशीनगरात एक क्रिकेट सट्ट्याचा अड्डा चालविला जातो, अशी माहिती गुन्हेशाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पवन मोरे, पंकज घाडगे, हवालदार शाम अंगुथलेवार, प्रशांत लाडे, रामचंद्र कारेमोरे, दशरथ मिश्रा, नायक शाम कडू, प्रवीण गोरटे, अनिल बाटरे, आदींनी शनिवारी सायंकाळी मदन शाम अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. येथे आरोपी पंकज थावरानी बेटिंग करताना आढळला. त्याच्या चौकशीतून या अड्ड्याचा सूत्रधार तन्नू चेलवानी असल्याचे उघड झाले. तो आणि नवीन धर्मानी हे दोघे फरार आहेत. पोलिसांनी या अड्ड्यावरून टीव्ही, पाच मोबाईल, दुचाकी आणि बेटिंगच्या नोंदीचा पाना जप्त केला.

---

तन्नू पुराना खिलाडी

क्रिकेट बेटिंगचा तन्नू चेलवानी पुराना खिलाडी आहे. तो बुकी आणि पंटरला लाईन देतो. त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झालेली आहे. तरीसुद्धा तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या मागे साधारणता अर्धा किलोमीटर अंतरावर हा अड्डा चालवत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने ही सदनिका धर्मानीच्या नावावर भाड्याने घेतली होती.

Web Title: Betting on the Australian Big Bash League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.