डम्पिंग यार्डमधील सुपारी जातेय निरपराधांच्या घशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 22:28 IST2022-12-03T22:28:06+5:302022-12-03T22:28:42+5:30
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या दणक्याने उपराजधानीतील सुपारी माफियांच्या शंभरावर गोदामांचे टाळे तीन दिवसांपासून उघडले नसले तरी सडली सुपारी टणक करणाऱ्या भट्टया मात्र सुरू आहेत.

डम्पिंग यार्डमधील सुपारी जातेय निरपराधांच्या घशात
नरेश डोंगरे !
नागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या दणक्याने उपराजधानीतील सुपारी माफियांच्या शंभरावर गोदामांचे टाळे तीन दिवसांपासून उघडले नसले तरी सडली सुपारी टणक करणाऱ्या भट्टया मात्र सुरू आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्याच्या नावाने हा गोरखधंदा करणारे सुपारी माफिया डंपिंग यार्डमधील सुपारी निरपराध नागरिकांच्या घशात घालत आहेत.
उपराजधानीतील सुपारी माफियांनी मध्य भारतात गेल्या पाच वर्षांपासून हैदोस घालणे सुरू केले. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका आदी सुपारी उत्पादक देशात सुपारीचे प्रचंड उत्पादन होते. त्यातील निकृष्ट दर्जाची सुपारी संबंधित उत्पादक घाणीच्या ढिगाऱ्यावर (डम्पिंग यार्डमध्ये) फेकून देतात. तेथे ती सुपारी सडून जास्तच घातक होते. ही सडलेली सुपारी कंटेनरमध्ये भरून आसाम, कोलकाता, चेन्नईसह ठिकठिकाणच्या बंदरावर आणली जाते. तेथून ट्रक भरून ती नागपुरात पोहचते. नागपुरात या सडलेल्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून तिची भट्टी लावली जाते. त्यानंतर ही सुपारी शुभ्र आणि टनक बनते. नागपुरातील कळमना, लकडगंज वर्धमाननगर, कापसी, माैदा आणि अन्य काही भागात सडल्या सुपारीला टणक बनविणाऱ्या अनेक भट्ट्या आहेत. या भट्टया उध्वस्त झाल्यास मध्यभारताच्या सुपारी माफियांचे दात पाडल्यासारखे होईल.
आजुबाजुच्या प्रांतातही नेटवर्क
नागपुरातील सुपारी माफियांचे विविध प्रांतात तगडे नेटवर्क आहे. टणक बनलेली सुपारी तुकड्यात कापून ती महाराष्ट्राच्या विविध भागात तसेच, दिल्ली, ईटारसी, आग्रा, भोपाळसह मध्यप्रदेशमधील अनेक शहरात, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये ट्रकने पाठविली जाते. याच सुपारीपासून वेगवेगळा गुटखा, खर्रा, सुगंधित सुपारी, मिठी सुपारी बनवून ती सर्रास विकली जाते. या सुपारीच्या नियमित सेवनामुळे घशाचा कर्करोग, लॉक जा सारखे घातक रोग होतात.
लोकमतने अनेकदा केला पर्दाफाश
ईडीने दणका दिल्यानंतर या धंद्यातील प्रकाश गोयल, वसीम बावला, आसीफ कलीवाला, हिमांशू भद्रा, हेमंत कुमार यांच्या बरोबरीने सुपारीचा डाव लावणारे अल्ताफ भोपाली, बंटी माैर्या, संजय पाटना, राजा वेन्सनी चारमिनार हे भूमिगत झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोट्यवधींचा धंदा करीत असून लोकमतने त्यांचा गोरखधंदा यापूर्वी अनेकदा उजेडात आणला होता. सध्या भोपाली राजा बेकरी आणि विक्की नागदेवेच्या माध्यमातून धंदा करीत आहे.