घरकूल योजनेचे लाभार्थी हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:54 IST2017-07-21T02:54:39+5:302017-07-21T02:54:39+5:30
महाराष्ट्र शासनाच्या विशेष जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत समाजातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना राबविली जाते.

घरकूल योजनेचे लाभार्थी हरवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विशेष जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत समाजातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना राबविली जाते. नागपूर शहरात महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गेल्या सात वर्षात ४७३७ अर्ज आले होते. परंतु यातील जेमतेम ७०५ अर्जधारकांना लाभ देण्यात आला आहे. तर १६८८ अर्जधारक ांचा सर्वेक्षणात शोध लागला नाही. यावर आक्रमक भूमिका घेत योजनेचे इच्छुक लाभार्थी कुठे गेले, असा सवाल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केला.
घरकूल योजनेंतर्गत मार्च २०१७ पर्यंत किती निधी वाटप करण्यात आला असा प्रश्न संदीप सहारे यांनी उपस्थित केला होता. या योजनेसाठी शासनाकडून प्राप्त झालेला १४ कोटींचा निधी वेळेत खर्च न केल्याने एक कोटी नऊ लाखांचा निधी अखर्चित आहे. दुसरीकडे लाभार्थींना पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते.
यामुळे गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप सहारे यांनी केला. रमाई आवास योजनेचाही गरजूंना लाभ मिळत नसल्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी निदर्शनास आणले.
शासनाच्या निर्देशानुसार या योजनेत निवृत्त वा मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयासाठी १५ टक्के घरे राखीव ठेवली जातात. या लाभार्थींची यादी तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
शासन धोरणानुसार योजना राबविणार
घरकूल योजना म्हाडातर्फे राबविली जाते. यात महापालिका नोड्यूल एजन्सी आहे. २०१५ मध्ये ९४२ लाभार्थीची यादी तयार करण्यात आली आहे. म्हाडाकडे ही यादी मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार ही योजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त अश्विन मुद्गल यांनी सभागृहात दिली.