सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे आमदारांच्या घरासमोर घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 20:54 IST2019-09-05T20:53:39+5:302019-09-05T20:54:58+5:30
सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे गुरुवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला.

आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी चर्चा करताना सेव्ह मेरीट सेव्ह नेशनचे शरद खंडेलवाल, विनोद फाफट, राजेश सिंघवी आणि कार्यकर्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे गुरुवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला.
घंटानाद आंदोलनासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे शरद खंडेलवाल, विनोद फाफट, राजेश सिंघवी यांच्यासह कार्यकर्ते तेलीपुरा, सतरंजीपुरा येथील आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर गोळा झाले. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारचे आरक्षण यामुळे राज्यात आरक्षणाचा टक्का ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर परिणाम होत असून नोकऱ्यातही खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळावा, नोकरी व अभ्यासक्रमातील प्रवेशात समान संधी मिळावी यासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपर्यंत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदार कृष्णा खोपडे यांनी संघटनेची भूमिका मांडण्याचे आश्वासन दिले. ६ सप्टेंबरला आमदार प्रा. अनिल सोले, ७ सप्टेंबरला आमदार विकास कुंभारे आणि ८ सप्टेंबरला आमदार सुधाकर देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे विवेक भोरे, विवेक हरकरे, नवीन चांडक, अमित सियोया यांनी कळविले आहे.