Be careful! Food adulteration can occur during the festive season | सावधान! सणासुदीच्या काळात होऊ शकते खाद्यपदार्थांमध्ये भेसळ

सावधान! सणासुदीच्या काळात होऊ शकते खाद्यपदार्थांमध्ये भेसळ

ठळक मुद्दे ग्राहकांनी सावध होऊन खरेदी करावी : एफडीएची तपासणी मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलामध्ये भेसळीची सर्वाधिक शक्यता असून ग्राहकांनी सावधतेने खरेदी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केले आहे. सध्या विभागाने खाद्यतेलातील भेसळ शोधून काढण्याच्या मोहिमेंतर्गत लाखो रुपयांचे भेसळयुक्त आणि खुले तेल जप्त केले आहे. याशिवाय १५ ऑगस्टनंतर खाद्यपदार्थ आणि मिठाईची तपासणी मोहीम हाती घेणार असल्याची माहिती आहे.

वेळेत येत नाहीत विश्लेषण अहवाल
भेसळयुक्त पदार्थ व तेलाची विक्री करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. शिवाय प्राप्त माहितीच्या आधारे शहरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, विभागाने अनेक खाद्यपदार्थ व खाद्यतेल विक्रेत्यांवर छापे टाकले आणि अन्नपदार्थ जप्त करून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. पण आतापर्यंत किती जणांचे विश्लेषण अहवाल प्रयोगशाळेत प्राप्त झालेत, याची माहिती विभागाकडे नाही. त्यामुळे अधिकारी विक्रेत्यांवर पुढील कारवाई कशी करणार, हा गंभीर प्रश्न आहे. पूर्वीही वर्धमाननगर येथील रॉयल ड्रिंक्स येथील मद्य कारखान्यातील सॅनिटायझरचा साठा एफडीएने प्रतिबंधित केला होता. १७ एप्रिलच्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर १४ दिवसात अहवाल येणे अपेक्षित आहे. मात्र साडेतीन महिन्यानंतरही अहवालच आला नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बाटलीतील सॅनिटायझरचे तीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र तपासणीच झाली नसल्याने पुढील कारवाईच होऊ शकली नाही.

दूध आणि खव्यात सर्वाधिक भेसळ
सणासुदीत दूध आणि खव्याचा सर्वाधिक उपयोग होतो. दूध आणि खव्यापासून तयार झालेली मिठाई हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये विकली जाते. दरवर्षी भेसळीच्या तक्रारी होतात. विभागाकडे केवळ नमुने घेऊन कारवाई केली जाते. पण पुढे हॉटेल संचालकांवर कठोर कारवाई केल्याचे आढळून आले नाही. असे असताना कारवाईदरम्यान हॉटेल सील करण्याची कारवाई विभागाने करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे यांनी केली आहे. अशा कठोर कारवाईमुळे ग्राहकांना दिलासा मिळेल आणि शुद्ध खाद्यपदार्थ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सणासुदीच्या दिवसात खाद्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढते. या भेसळीला रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे एफडीएला भेडसावत असलेला मनुष्यबळाचा प्रश्न आणि अपुºया साधनांमुळे या तपासण्या रखडल्याचे ‘एफडीए’कडून सांगण्यात येत आहे.

खाद्यपदार्थांची तपासणी मोहीम १५ ऑगस्टनंतर
सध्या खाद्यतेल तपासणी मोहीम निरंतर सुरू असून पुढील सणांच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टनंतर खाद्यपदार्थ आणि मिठाई तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ग्राहकांना शुद्ध खाद्यपदार्थ मिळावेत, हा मोहिमेचा भाग आहे. विभागाची कारवाई पुढेही निरंतर सुरू राहणार आहे.
अभय देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: Be careful! Food adulteration can occur during the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.