लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोराडी येथे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालविण्यात यावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास आणखी निधीची तरतूद करण्यात येईल. मात्र, आता यामध्ये कुचराई केलेली खपवून घेणार नाही असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. विधानभवनातील महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी महसूलमंत्री बोलत होते.
कोराडी येथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी वस्त्रोद्योग उभारण्यात आला आहे. याठिकाणी चांगले काम सुरु असताना इचलकरंजी येथील वरद कंपनीने योग्यप्रकारे मशीनचा पुरवठा न केल्याने योग्यप्रकारे काम झालेले नाही. त्यामुळे वरद या कंपनीवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून मशीनचा पुरवठा तात्काळ करुन घेण्यात यावा. तसेच सर्वात चांगले काम करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे काम करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.
महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, सोशल बफेट या कंपनीवर करण्यात आलेली कारवाई चुकीची असून त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. या कालावधीत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करावयाचे आहे. मात्र, यापुढे असे होता कामा नये. पुन्हा चुकीचा प्रकार घडला तर यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या कंपनीच्या संचालिका निवेदिता नाहर व इचलकरंजीतील वरद एन्टरप्रायझेसचा मालक उमेश रॉय जाधवविरोधात ८७ लाखांचा गैरव्यवहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.