नदीत अंघाेळ करणे दोन भावांच्या जीवावर बेतले; आई सरपण गोळा करण्यात होती मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 21:54 IST2022-02-07T21:54:22+5:302022-02-07T21:54:54+5:30
Nagpur News आईसाेबत सरपण गाेळा करायला गेली आणि दाेघे भाऊ अंघाेळ करण्यासाठी टाकळघाट (ता. हिंगणा) नजीकच्या कृष्णा नदीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना साेमवारी (दि. ७) दुपारी घडली.

नदीत अंघाेळ करणे दोन भावांच्या जीवावर बेतले; आई सरपण गोळा करण्यात होती मग्न
नागपूर : आईसाेबत सरपण गाेळा करायला गेली आणि दाेघे भाऊ अंघाेळ करण्यासाठी टाकळघाट (ता. हिंगणा) नजीकच्या कृष्णा नदीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना साेमवारी (दि. ७) दुपारी घडली.
रिजवान जनकब खान (११) व इमामुल रुस्तम खान (८) दाेघेही रा. गणेशपूर, ता. हिंगणा अशी मृत मुलांची नावे आहेत. दाेघेही भाऊ असून, ते साेमवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्यांच्या आईसाेबत गणेशपूर शिवारातील कृष्णा नदीच्या परिसरात सरपण गाेळा करण्यासाठी गेले हाेते. आई नदीच्या परिसरात काड्या गाेळा करीत असताना दाेघांनीही काही वेळ आईला मदत केली आणि ते आईची नजर चुकवून कृष्णा नदीत अंघाेळ करण्यासाठी उतरले.
विशेष म्हणजे, यातील कुणालाही पाेहता येत नव्हते. अंघाेळ करीत असताना पाण्याच्या खाेलीचा अंदाज चुकला आणि दाेघेही खाेल पाण्यात गेले व गटांगळ्या खाऊ लागले. काही वेळाने दाेघेही दिसेनासे झाल्याने आईने त्यांचा शाेध घेतला. दाेघेही नदीत बुडाल्याची शंका आल्याने तिने कुटुंबीयांना व शेवटी पाेलिसांना सूचना दिली.
पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून दाेघांचा शाेध घेतला. दाेघांनाही शाेधून काढण्यात पाेलिसांना यश आले. मात्र, ताेपर्यंत दाेघांचाही बुडून मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी दाेघांचही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविले. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.