हरवलेल्या मुलीला शोधण्यात ‘सोशल मीडिया’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:28 PM2018-03-13T14:28:19+5:302018-03-13T14:34:14+5:30

पोलिसांनीही माणुसकीचा परिचय देत तिचे छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केले. याच सोशल मीडियामुळे अखेर ती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.

The basis of 'social media' to find a missing daughter | हरवलेल्या मुलीला शोधण्यात ‘सोशल मीडिया’चा आधार

हरवलेल्या मुलीला शोधण्यात ‘सोशल मीडिया’चा आधार

Next
ठळक मुद्देगतिमंद मुलगी पोहोचली कुटुंबीयांपर्यंत : नागपुरातील हिंगणा पोलिसांचा हातभार, चार दिवसांपूर्वी दुरावली होती कुटुंबीयांपासून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वय २५ वर्षे, पण तिच्या शरीरयष्टीवरून ती १२ वर्षांचीच तर नाही ना, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. तिला स्पष्ट बोलताही येत नाही. गतिमंद मुलगीच ती... बुलडाणा येथून वडिलांसोबत मेडिकलमध्ये आली असताना ती वडिलांपासून दूर झाली... शोधाशोध केली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. चालत चालत तब्बल १०-१२ कि.मी. पेवठा शिवारापर्यंत पोहोचली. तिच्या इकडे-तिकडे फिरण्याने संशय आला. त्यामुळे हिंगणा पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही माणुसकीचा परिचय देत तिचे छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केले. याच सोशल मीडियामुळे अखेर ती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.
उषा धुरंदर (२५, रा. वाघुडा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) असे या मुलीचे नाव. ती गतिमंद असल्याने तिला उपचारासाठी तिचे वडील अशोक धुरंदर यांनी ८ मार्चला तिला मेडिकलमध्ये आणले होते. तेथे वडिलांची चुकामूक होऊन ती तेथून निघाली. नीटसे बोलताही येत नसल्याने तिच्यासमोर समस्या उद्भवली. इकडे तिच्या वडिलांनी बराच वेळ शोधाशोध केली; मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. निराश होऊन अखेर त्यांनी गाव गाठले.
दुसरीकडे उषा ही चालत चालत पेवठा शिवारातपर्यंत पोहोचली. तिच्या शरीरयष्टीमुळे ती १२-१३ वर्षांचीच वाटत असल्याने आणि इकडे-तिकडे फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी हिंगणा पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत उषाला विचारपूस केली. बोबडे बोल काढत तिने बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांचा उल्लेख केला. त्यामुळे ती बुलडाणा जिल्ह्यातील असावी, अशी पोलिसांना खात्री झाली. तिला मुलींच्या वसतिगृहात सोडले आणि पोलिसांनी अखेर शोधमोहीम राबविली.
हिंगणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी विक्रांत व विनोद यांनी तिचा फोटो काढून ‘व्हॉटसअ‍ॅप’ या सोशल मीडियाच्या बुलडाणा जिल्ह्यातील ग्रुपवर तो पाठविला. दरम्यान, एका ग्रुपवर वाघुडा येथीलच तरुणाने तिला ओळखले. ती आपल्याच गावची असल्याचे सांगून त्याने उषाचे वडील अशोक धुरंदर आणि आई इंदूबाई यांना ही माहिती दिली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सोमवारी (दि. १२) हिंगणा पोलीस ठाणे गाठले. तिथे ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी शहानिशा करून उषाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

Web Title: The basis of 'social media' to find a missing daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.