‘बार्टी-समता’चे कर्मचारी वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:01+5:302020-12-12T04:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभागा अंतर्गत असलेल्या बार्टी व समता प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन ...

‘बार्टी-समता’चे कर्मचारी वेतनापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभागा अंतर्गत असलेल्या बार्टी व समता प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे. परंतु वेतन मिळाले नसल्याने कर्मचारी मोठ्या संकटात सापडले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान या दोन महत्त्वाच्या संस्था सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत आहेत. बार्टी ही स्वायत्त संस्था असून समता प्रतिष्ठान ही स्वतंत्र कंपनी आहे. नागपूर हे समता प्रतिष्ठानचे मुख्यालय आहे तर नागपूर हे बार्टीचे प्रादेशिक कार्यालय आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत जात पडताळणी विभागानंतर सर्वात महत्त्वाचे विभाग म्हणून या दोन विभागाची ओळख आहे. बार्टी व समता प्रतिष्ठान म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे चेहरे म्हणूनही पाहिले जातात. या दाेन्ही विभागातील नागपुरात कार्यरत कर्मचारी मोठ्या इमानेइतबारे आपली कामे करीत आहेत. कोराेनाच्या संकटात विभागाचा निधीत कपात झाली. अनेक कार्यक्रमांवर परिणाम झाला परंतु आता अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनच संकटात आले आहे. मागील दोन महिन्यापासून येथील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. आज ना उद्या निधी मिळेल आणि आपले वेतनही होईल, या प्रतीक्षेत कर्मचारी होते. परंतु दोन महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांचे घरातील बजेटही बिघडले आहे.
नोकरीवरील टांगत्या तलवारीची भीती
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच विभागाच्या निधीत प्रचंड कपात झालेली आहे. सामाजिक न्याय विभागावरही त्याचा परिणाम झाला आहे. कर्मचारी कपात होणार असल्याची चर्चाही आहे. यातच आधीच दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीतीही सतावत आहे.