मेट्रोतील ग्राहकांना बँकिंग सेवेचा फटका
By Admin | Updated: August 8, 2014 01:11 IST2014-08-08T01:11:36+5:302014-08-08T01:11:36+5:30
आर्थिक वर्षात बँकिंग लोकपालकडे १०,६२० तक्रारी आल्या. त्यापैकी ९४.५४ टक्के अर्थात १०,०४१ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. सर्वाधिक ६४६४ तक्रारी मेट्रो शहरातील ग्राहकांच्या असल्याची

मेट्रोतील ग्राहकांना बँकिंग सेवेचा फटका
महाराष्ट्र व गोव्याच्या बँकिंग लोकपालची माहिती : वर्षभरात १० हजार तक्रारींचा निपटारा
नागपूर : आर्थिक वर्षात बँकिंग लोकपालकडे १०,६२० तक्रारी आल्या. त्यापैकी ९४.५४ टक्के अर्थात १०,०४१ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. सर्वाधिक ६४६४ तक्रारी मेट्रो शहरातील ग्राहकांच्या असल्याची माहिती महाराष्ट्र व गोव्याच्या बँकिंग लोकपाल आर. सॅबेस्टियन यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
विविध बँकांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांना बँकिंग लोकपालची माहिती देण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या वतीने लक्ष्मीनगर येथील एका हॉटेलमध्ये माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात मार्गदर्शन करण्यासाठी त्या नागपुरात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बँक आॅफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक तारलोचन सिंग आणि लोकपालच्या सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या उपमहाव्यवस्थापक एस.व्ही. नाडकर्णी उपस्थित होते.
सॅबेस्टियन यांनी सांगितले की, ३० जूनपर्यंत कोणतीही तक्रार प्रलंबित नाही. तक्रारींचा लेखाजोखा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे सादर केला आहे. बँकेच्या सेवेशी संबंधित विविध तक्रारी लोकपालकडे येतात. या तक्रारीचा निपटारा तीन महिन्यांच्या आत केला जातो. एटीएम, डेबिट व क्रेडिट कार्ड, कर्जविषयक प्रकरणे, पेन्शन आदींसह अन्यविषयक तक्रारी लोकपालकडे करता येतात. ग्राहकांची तक्रार प्रारंभी शाखा स्तरावर, झोनल, फिल्ड महाव्यवस्थापक सोडविली जाते. तिथे न्याय मिळाल्यास ग्राहक लोकपालकडे तक्रार करू शकतो. यासाठी तक्रारकर्त्याला संबंधित सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. केवळ फॉर्म भरून तक्रार करू शकतो. बँकांना लोकपालच्या आदेशाचे पालन करावे लागते. लोकपालच्या निर्णयावर ग्राहक समाधानी नसेल तर तो रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरकडे दाद मागू शकतो.
सिंग यांनी सांगितले की, बँकिंग लोकपाल राज्यात एकच असतो. बँकिंग लोकपालची माहिती देण्यासाठी बीओआयने कार्यक्रमाचे आयोजन केले. नागपूर विभागात सर्व बँकांच्या एकूण ५११ शाखा असून बीओआयच्या ६९ शाखा आहेत. ग्राहकांना परिपूर्ण बँकिंग सुविधा मिळाव्यात, असा बँकेचा प्रयत्न आहे. नाडकर्णी यांनी यांनी सांगितले की, बँकिंग लोकपाल योजना-२००६ म्हणजे बँक ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तयार केलेली एक नियमावली आहे. ग्राहकाने नाव, पत्ता, टेलिफोन, खाते क्रमांक, के्रडिट व डेबिट कार्ड क्रमांक आणि ज्या बँकेविरुद्ध तक्रार करायची आहे त्या बँकेचे नाव व माहिती द्यावी. पत्रपरिषदेत बँक आॅफ इंडियाच्या नागपूर झोन-१ चे व्यवस्थापक पी.जी. भागवतकर, नागपूर झोन-२ चे व्यवस्थापक आर.एम. कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)