बँकेची फसवणूक करणारा गुलाम पोहोचला तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 22:31 IST2022-06-13T22:29:46+5:302022-06-13T22:31:06+5:30
Nagpur News फसवणूक आणि वसुलीच्या प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी गुलाम अशरफी आणि त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत गेले आहेत.

बँकेची फसवणूक करणारा गुलाम पोहोचला तुरुंगात
नागपूर : फसवणूक आणि वसुलीच्या प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी गुलाम अशरफी आणि त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. ३.४६ कोटींची अफरातफर आणि वसुलीत गुलामला अटक करण्यासाठी पाचपावली पोलीस सक्रिय झाले आहेत.
गुलाम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध लकडगंज आणि पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलामने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन इतवारीच्या बँक ऑफ महाराष्ट्रची १.८९ कोटीने फसवणूक केली होती. यात गुलाम अशरफी, त्याचा ऑफीस बॉय इमरान खान उस्मान खान, नीतेश कमलनाथ गजभिये, हंसराज परसराम पौनीकर तसेच चिंटू चेतलाल महंतोला अटक करण्यात आली होती. यात गुलामचा साथीदार लोकेश सर्पेही वॉन्टेड होता.
दरम्यान, टाटा फायनान्सचे व्यवस्थापक गीतेश गोतमारे यांनी गुलाम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ३.४६ कोटीची २६ वाहने हडपल्याचा गुन्हा दाखल केला. यात गुलाम अशरफी, त्याचा भाऊ मुश्ताक अशरफी, लोकेश सर्पे, इब्राहिम खान, इसाक कुरेशी, सलीम आणि जावेदचा हात आहे. त्यांच्याविरुद्ध अफरातफर आणि हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात लोकेश सर्पेलाही अटक करण्यात आली आहे. लकडगंजमध्ये दाखल असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या फसवणूक प्रकरणात १ जूनला गुलामला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले. ते आतापर्यंत पोलिसांच्या कोठडीत होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
आता पाचपावली पोलीस गुलामला अटक करणार आहेत. गुलाम आणि त्याच्या साथीदारांच्या अटकेनंतर त्यांचे उत्तर नागपुरात सक्रिय असलेले साथीदार चिंतेत आहेत. आपण फसल्या जाऊ, या भीतीने ते भूमिगत झाले आहेत. हे साथीदार गुलाममुळे पीडित असलेल्यांना पोलिसांकडे पोहचू देत नसल्याची स्थिती आहे. हे साथीदार बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीओच्या मदतीने चोरीच्या आणि बाहेरील राज्यातील वाहनांच्या विक्रीचे रॅकेट चालवितात. गुलामच्या अटकेनंतर त्याला वाचविण्यासाठी ते सक्रिय झाले होते. परंतु पोलिसांची कडक भूमिका पाहून ते शांत झाले.
............