प्रेमभंगामुळे नागपुरात बँकेच्या महिला कॅशियरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:03 PM2019-11-29T12:03:23+5:302019-11-29T12:05:31+5:30

सिंडीकेट बँकेच्या महिला कॅशियर प्रियंका राघोबाजी देवघरे (वय २९) हिच्या आत्महत्येच्या कारणाचा अखेर सात दिवसानंतर उलगडा झाला.

Bank cashier commits suicide in Nagpur | प्रेमभंगामुळे नागपुरात बँकेच्या महिला कॅशियरची आत्महत्या

प्रेमभंगामुळे नागपुरात बँकेच्या महिला कॅशियरची आत्महत्या

Next
ठळक मुद्देप्रियकराने केली दगाबाजी मानसिक त्रासही दिला सुसाईड नोटमधून उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिंडीकेट बँकेच्या महिला कॅशियर प्रियंका राघोबाजी देवघरे (वय २९) हिच्या आत्महत्येच्या कारणाचा अखेर सात दिवसानंतर उलगडा झाला. प्रियकराने दगाबाजी करून लग्नास नकार दिल्याने तसेच प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे प्रियंकाने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुरुवारी गणेशपेठ पोलिसांनी प्रियंकाचा प्रियकर आरोपी दिनेश वासुदेवराव पडोळे (रा. नंदनवन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रियंका गोळीबार चौकात राहत होती. ती सिंडीकेट बँकेच्या महाल शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे २२ नोव्हेंबरला सकाळी ती कर्तव्यावर जाते, असे सांगून घरून बाहेर निघाली. नेहमीची परत येण्याची वेळ संपूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद मिळत नसल्याने चिंताग्रस्त कुटुंबीय तिच्या शोधासाठी बाहेर पडले. रात्री १० च्या सुमारास गांधीसागर तलावाजवळ प्रियंकाची दुचाकी दिसल्याने तिचे नातेवाईक तिथे पोहचले. त्यांना पाण्यातून बाहेर काढलेला प्रियंकाचा मृतदेह दिसला. तिच्या वडिलांनी लगेच गणेशपेठ पोलिसांना कळविले.
दरम्यान, प्रियंकाच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली होती.
चांगल्या पगाराची बँकेतील नोकरी करणाऱ्या प्रियंकाने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झाले नसल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू होती. यासंबंधाने चौकशी केली असता प्रियंकाने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये आढळली. त्यात तिने आरोपी दिनेश पडोळेच्या धोकेबाजीचा आणि त्याच्याकडून मिळणाºया मानसिक त्रासाचा उल्लेख केला होता.
प्रियंका जेथे कार्यरत होती, त्याच बँकेत आरोपी दिनेश पडोळे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या संबंधाची माहिती दोघांच्याही घरच्यांना होती. घरची मंडळी लग्न लावून देण्यासाठी तयारही होती.
दरम्यान, आरोपी दिनेशची तेथून दुसºया शाखेत बदली झाली. तिकडे त्याने दुसºया तरुणीसोबत सूत जुळविले आणि तिच्यासोबत साक्षगंधही उरकले. हा प्रकार माहीत पडल्याने प्रियंकाला जबर मानसिक धक्का बसला.
तिने याबाबत त्याला जाब विचारला असता, त्याने उलटसुलट आरोप लावून प्रियंकाला प्रचंड मानसिक त्रास दिला. एवढेच नव्हे तर तिला लग्नासही नकार दिला. त्याच्या धोकेबाजीमुळे व्यथित झालेल्या प्रियंकाने आत्महत्या केल्याचे तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले. त्यामुळे प्रियंकाची आई रेखा देवघरे (वय ५५) यांची तक्रार नोंदवून घेत पोलीस उपनिरीक्षक विनायक जाधव यांनी गुरुवारी दिनेश पडोळेविरुद्ध प्रियंकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Bank cashier commits suicide in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.