ईअर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाच्या वाहतुकीला बंदी, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य

By आनंद डेकाटे | Updated: May 30, 2024 18:39 IST2024-05-30T18:39:01+5:302024-05-30T18:39:16+5:30

नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील पशुधनास ईअर टॅगिंग अनिवार्य राहणार आहे.

Ban on movement of livestock without ear tagging, Mandatory registration with India Livestock System | ईअर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाच्या वाहतुकीला बंदी, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य

ईअर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाच्या वाहतुकीला बंदी, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य

नागपूर : सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन “भारत पशुधन” प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. पशुधनामधील सांसर्गीक रोगांना प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमाद्वारे सर्व पशुधनांचे ईअर टॅगिंग करुन या प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक पशुसंर्वधन सहआयुक्त डॉ. सतीश राजू यांनी दिली.

नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील पशुधनास ईअर टॅगिंग अनिवार्य राहणार आहे. १ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंग असल्याशिवाय पशुवैद्यकीय संस्था, दवाखाने यांच्यामार्फत पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही. तसेच कत्तलखान्यांमध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी माहिती डॉ. राजू यांनी दिली.

कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग नसल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाही करण्यात येईल. पर राज्यातून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर आवश्यक करण्यात आली आहे. तपासणी नाक्यावरील पशुसवंर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईअर टॅगिंग करुन त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करण्यात यावी. १ जून २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग शिवाय करता येणार नाही.

पशुधनाच्या विक्रीसाठी बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील विक्री १ जुन नंतर ईअर टॅगिंग शिवाय होणार नाही. त्यासोबत सर्व ग्रामपंचायत महसूल विभाग, गृह विभाग यांनी ईअर टॅगिंग शिवाय बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांना सहभागी करता येणार नाही अथवा पशुधन विभागातर्फे परवानगी देण्यात येणार नाही. पशुपालकांनी १९६२ भारत पशुधन हा ॲप डाऊनलोड करुन भारत पशुधन प्रणालीवर सर्व प्रकारच्या पशुधनाची तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशिक पशुसंर्वधन सहआयुक्त डॉ. सतीश राजू यांनी केले आहे.

नुकसान भरपाईसाठी टॅगिंग अनिवार्य
नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाची हानी अथवा मृत्यू झाल्यास पशुधनास ईअर टॅगिंग असणे आवश्यक आहे. ईअर टॅगिंग नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही यासंदर्भात सर्व महसूल, वन, महावितरण आदी विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Ban on movement of livestock without ear tagging, Mandatory registration with India Livestock System

टॅग्स :nagpurनागपूर