‘बॅडबॉय’ चे कृत्य बॅडच
By Admin | Updated: May 7, 2015 02:07 IST2015-05-07T02:07:49+5:302015-05-07T02:07:49+5:30
सलमान अभिनेता आहे म्हणून काय झालं. तो शेवटी गुन्हेगार आहे.

‘बॅडबॉय’ चे कृत्य बॅडच
नागपूर : सलमान अभिनेता आहे म्हणून काय झालं. तो शेवटी गुन्हेगार आहे. त्याच्यावरील गुन्हाही सिद्ध झाला आहे. कारण एका गरीब निष्पापाचा त्याने बळी घेतलाय. इतरांना आयुष्यभर अपंगत्व दिलेय. कायद्यासमोर सगळेच समान आहेत. न्यायालयाने त्याला ठोठावलेली शिक्षा म्हणजे न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट होणे आहे. भविष्यात यामुळे वचकही निर्माण होईल. वॉलीवूडच्या ‘बॅडबॉय’चे कृत्य बॅडच’ (चुकीचे) होते अशा प्रतिक्रिया नागपूरकरांनी व्यक्त केल्या.
प्रत्येकालाच आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. परंतु आपल्या चुकीमुळे जर कुणी निरपराध व्यक्तीचा जीव घेत असेल तर ते दुर्दैवी आहे. दारूपिऊन निरपराध व्यक्तीचा बळी घेणाऱ्या सलमान खानला न्यायालयाने दिलेली शिक्षा अगदी योग्य आहे. ‘सेलिब्रिटी’ असो की सर्व सामान्य नागरिक, सर्वांसाठी कायदा सारखाच आहे.
फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांवर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या सलमान खानला आज न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा सुनावली. सलमान खान सेलिब्रिटी असल्यामुळे त्याला शिक्षा होणार नाही, अशा वावड्या ऐकायला मिळत होत्या. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे त्या खोट्या ठरल्या. सलमान खानला शिक्षा झाल्याची वार्ता पसरताच नागपूरकर नागरिकांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर वचक निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. तसेच गुन्हा केलेल्या प्रत्येकाला शिक्षा झाल्यास देशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण होईल. (प्रतिनिधी)
सलमानला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश होते नागपुरातही
हिट अँड रन प्रकरणी आघाडीचा चित्रपट अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांची शिक्षा सुनावणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे हे काही काळ नागपूर जिल्हा न्यायालयात कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार २००१-२००२ या काळात देशपांडे हे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे न्यायालय क्रमांक १ चा कार्यभार होता. या न्यायालयात इमामवाडा, सक्करदरा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतची प्रकरणे दाखल होतात. सलमानला शिक्षा सुनावताच देशपांडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले. यापूर्वीही चित्रपट अभिनेता संजय दत्त याला शिक्षा देणारे त्यावेळचे मुंबई येथील टाडा न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. कोदे हे देखील प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पुढे कोदे यांची बढती होऊन ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. काही काळ ते नागपूर खंडपीठात होते.