मागासवर्गीय प्राध्यापक एकजूट होणार, संयुक्त सभेत निर्धार; समावेशक संघटना उभी करून संघर्ष करणार
By आनंद डेकाटे | Updated: September 17, 2022 17:48 IST2022-09-17T17:03:42+5:302022-09-17T17:48:12+5:30
आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील सभागृहात मागासवर्गीय प्राध्यापकांच्या सर्व संघटनाच्या प्रतिनिधींची एकत्रिकृत सभा पार पडली.

मागासवर्गीय प्राध्यापक एकजूट होणार, संयुक्त सभेत निर्धार; समावेशक संघटना उभी करून संघर्ष करणार
नागपूर : मागासवर्गीयांच्या वेगवेगळ्या संघटना बरखास्त करून एकाच संघटने खाली एकजूट व्हावे. सर्व आंबेडकरवादी प्राध्यापकांनी राज्यव्यापी स्वरूपाची सर्वसमावेशक संघटना उभी करावी तसेच एकत्रिकृत संघटनेद्वारे विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणूका लढाव्या, असा निर्धार मागासवर्गीय प्राध्यापकांच्या संयुक्त सभेत व्यक्त करण्यात आला.
आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील सभागृहात मागासवर्गीय प्राध्यापकांच्या सर्व संघटनाच्या प्रतिनिधींची एकत्रिकृत सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. आंबेडकर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे हे होते. विचारपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, सिनेट सदस्य प्रा. डॉ. ओमप्रकाश चिमणकर, सिनेट सदस्य डॉ. केशव मेंढे, प्राध्यापकांचे नेते डॉ. मिलिंद साठे व डॉ. दीपक बारसागडे उपस्थित होते.
यावेळी आपआपल्या संघटना बरखास्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक असोसिएशन या नावाने सर्वसमावेशक संघटना उभी करण्याच्या एकमुखी निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी प्रा. शैलेंद्र लेंडे, प्रा. नीरज बोधी, डॉ. विकास जांभुळकर प्रा. जयंत रामटेके, प्रा. धीरज अंबादे, प्रा. खडसे, प्रा. प्रविणा खोब्रागडे, डॉ. वर्षा वासनिक, प्रा. श्रीकांत भोवते, प्रा. शशिकांत जांभुळकर, प्रा. कुंभारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.