बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही रुजलीच नाही

By Admin | Updated: May 30, 2014 01:12 IST2014-05-30T01:12:16+5:302014-05-30T01:12:16+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या देशात संविधानाच्या माध्यमातून केवळ राजकीय लोकशाही नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रुजवायची होती. परंतु राज्यकर्त्यांंनी संविधानाचा वापर केवळ

Babasaheb does not have the desired democracy | बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही रुजलीच नाही

बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही रुजलीच नाही

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या देशात संविधानाच्या माध्यमातून केवळ राजकीय  लोकशाही नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रुजवायची होती. परंतु राज्यकर्त्यांंनी  संविधानाचा वापर केवळ आपल्या पद्धतीने केला. राजकीय लोकशाहीवरच अधिक भर देण्यात  आला. त्यामुळे या देशात केवळ राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. बाबासाहेबांना अपेक्षित  सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रुजू शकली नाही, असे रोखठोक मत आंबेडकरी विचारवंत  व मुंबईचे अतिरिक्त आयकर आयुक्त सुबचन राम यांनी येथे व्यक्त केले.
 वंदना संघ दीक्षाभूमी आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान सभा डिबेटस्’चे  मराठी अनुवादित निकाय खंड ४, ५ व ६ संस्करणाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. डॉ.  वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या लोकार्पण सोहळ्याला भय्याजी खैरकर, लॉर्ड बुद्धा  टीव्हीचे संचालक सचिन मून, अनुवादकर्ता प्रा. देवीदास घोडेस्वार, वासुदेवराव थूल, विठ्ठलराव  डांगरे, रेवनदास लोखंडे, जमुना डगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 सुबचन राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक विचार लोकांपर्यंंत  पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. परंतु त्यासाठी एखाद्या मिशनरी     कार्यकर्त्याप्रमाणे  काम करावे लागेल. मिशनरीप्रमाणे आपण राहिलो तरच बाबासाहेबांना अपेक्षित संविधानिक  सामाजिक व आर्थिक लोकशाही रुजविता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी सध्याची परिस्थिती एकूणच अल्पसंख्यक व मागासवर्गीयांसाठी  बिकट असल्याचे समजावून सांगितले. संविधानामुळेच आम्ही मुक्त झालो आहोत. सार्वभौम झालो  आहोत. परंतु संविधानावर विश्‍वास नसणार्‍या मंडळींना हे नको आहे. त्यामुळे ते संविधानाची  व्याख्या नव्याने मांडू लागले आहेत. त्यामुळे ते सांगतात म्हणून त्यावर विश्‍वास ठेवू नका. आपली  पिढी वाचवायची असेल तर संविधानाचा अभ्यास करा. संविधानाच्या डिबेटस्मधून संविधानाची  खरी व्याख्या लक्षात येईल. तेव्हा त्याचा अभ्यास करा, कुणाच्या षड्यंत्राला बळी पडू नका, असे  आवाहन त्यांनी केले.
 भारतीय लोकशाही आणि संविधानाला वाचवायचे असेल तर व्यक्तिपूजेपासून सावध राहा, अशी  सूचनाही त्यांनी यावेळी केली. नेहा लोखंडे यांनी संचालन केले.  विठ्ठलराव डांगरे यांनी प्रास्ताविक  केले.  (प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची तयारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यास महाराष्ट्र शासन अपयशी  ठरले आहे. तेव्हा ते साहित्य प्रकाशित करण्यास राईटस् थिंकर्स पब्लिकेशन अँण्ड डॉक्युमेन्टेशन  प्रा.लि.च्या माध्यमातून आम्ही तयार आहोत. याबाबत महाराष्ट्र शासनाला पत्रव्यवहारसुद्धा  करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी यावेळी दिली.

Web Title: Babasaheb does not have the desired democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.