बाबांनी चहा विकला मी आयएएस होणार!
By Admin | Updated: June 3, 2014 03:04 IST2014-06-03T03:04:50+5:302014-06-03T03:04:50+5:30
त्या दाम्पत्याला दोन मुली. वंशाचा दिवा कोण वाढवणार?

बाबांनी चहा विकला मी आयएएस होणार!
९0.१५ टक्के गुण मिळविणार्या शुभांगीची जिद्द सुनील चरपे नागपूर त्या दाम्पत्याला दोन मुली. वंशाचा दिवा कोण वाढवणार? याची चिंता नाही. गरजही नाही. चहाची कॅन्टीन चालवून आपला उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. परंतु तरीही मुलींनी चांगले शिकावे, मोठय़ा हुद्याची नोकरी करावी, यासाठी त्यांचा आटापिटा. मुलीनेही बारावीच्या परीक्षेत ९0.१५ टक्के गुण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला सार्थक केले. माझे आई-वडील चहा विकतात. या बळावरच त्यांनी मला शिकविले. आता त्यांचे ऋण फेडायची वेळ माझी आहे. मला आता आयएएस होऊन आपल्या पालकांना चांगले दिवस दाखवायचे आहेत. ही जिद्द आहे शुभांगी नारेकर या विद्यार्थिनीची. शुभांगी सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ येथे कॉर्मस शाखेला होती. वडील दिलीप आणि आई मीराबाई हे सुरेंद्रगडसारख्या झोपडपट्टीत एका भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांना शुभांगी आणि कोकिळा या दोन मुली. शुभांगी बारावीला होती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव आहे. त्यामुळे दोन खोलीचे घर. त्यात चार जीव. सुखी समाधानाने राहतात. आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट घेतात, याची जाणीव दोन्ही मुलींना आहे. शुभांगी मोठी असल्याने ती जरा जास्त व शहाण्यासारखी वागते. आई-वडील दोघेही कामासाठी घराबाहेर असल्याने घरातील संपूर्ण कामे तीच करते. हे तिचे बारावीचे वर्ष असल्याने आई तिला फारसे काम करू देत नव्हती. तरी ती आपल्या अभ्यास सांभाळून आईला मदत करायचीच. शिकवणी लावली नाही. शाळेत नियमित जाणे आणि शिक्षकांनी दिलेले होमवर्क करणे यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. दहावीमध्ये ८२ टक्के गुण घेतल्याने आई-वडिलांचाही तिच्यावर फार विश्वास. आपली मुलगी नक्कीच नाव कमावणार, असे तिच्या आई-वडिलांना नेहमीच वाटायचे. हा विश्वास अखेर तिने सार्थ केला. पालीमध्ये १00 पैकी १00 शुभांगी ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिचे आदर्श. ज्या ठिकाणी ती अभ्यास करते, तिथे तिने डॉ. आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. यातून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे ती सांगते. या प्रेरणेतूनच पाली या विषयामध्ये शुभांगीने १00 पैकी १00 गुण घेतले आहे.