वृक्षतोडीने गहिवरलेल्या ‘बाबां’नी कोरली स्मरणशिला
By Admin | Updated: February 4, 2015 00:53 IST2015-02-04T00:53:32+5:302015-02-04T00:53:32+5:30
इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात.

वृक्षतोडीने गहिवरलेल्या ‘बाबां’नी कोरली स्मरणशिला
३६ वर्षे पूर्ण : आनंदवनमध्ये ‘त्या’ स्मृतींना उजाळा
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात. मात्र कळत-नकळत आनंदवनच्या स्थापनेसाठीही अनेक वृक्षांची आहुती द्यावी लागली होती. तेव्हा बाबा खूप व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली. मात्र आहुती दिलेल्या वृक्षांचे कायम स्मरण राहावे, यासाठी त्यांनी आनंदवनात अनामवृक्षांची स्मरणशिला कोरली. या कोनशिलेला ३६ वर्षे पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबांचे निसर्गावरही तेवढेच प्रेम होते, हेच या स्मरणशिलेवरून अंकित होते.
आनंदवनमुळे समाजाने वाळीत टाकलेल्या हजारो कृष्ठरुग्णांना आधार मिळाला. एकीकडे त्यांना आधार मिळाला असला, तरी त्यासाठी अनेक वृक्षांची तोड करावी लागली. वृक्षतोडीमुळे बाबांचे मन हेलावले. त्यामुळे बाबांनी आनंदवनात ४ फेब्रुवारी १९७९ रोजी ‘अमनवृक्षाची स्मरणशिला’ स्थापन केली. त्या वृक्षांचे स्मरण आजही आनंदवनमध्ये होत आहे.
आदर्श घेतील काय?
आनंदवन उभारताना शेकडो वृक्षांचा बळी गेला. त्यानंतर त्यापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. आज रस्ता चौपदरीकरणासाठी हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. वृक्ष हटविताना त्या वृक्षाच्या मोबदल्यात १० वृक्ष लावण्याची हमी द्यावी लागते, त्यानंतरच ते वृक्ष संबंधित ठिकाणाहून हटविण्यास परवानगी दिली जाते. परंतु, १० वृक्ष तर सोडा एक वृक्षही जगविण्यासाठी कुणी धडपडत नाही. कुणालाही त्याचे सोयरसुतक वाटत नाही. बाबांच्या या कार्याचा आदर्र्श साऱ्यांनीच घ्यायला हवा.