आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 06:46 IST2025-12-13T06:46:20+5:302025-12-13T06:46:54+5:30
विधान भवनाच्या लॉबीतच हाणामारी व शिवीगाळ करण्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद त्यावेळी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत उमटले होते. समितीचे अध्यक्ष आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चौकशी अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला.

आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
नागपूर : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी करणे आ. गोपीचंद पडळकर व आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. विशेषाधिकार समितीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आला. समितीने आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांना दोन दिवस दिवाणी कारावासाच्या शिक्षेची शिफारस केली आहे. सोबतच मुंबईसह नागपूर विधान भवनाच्या आवारात विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत प्रवेश करण्यासही दोघांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
विधान भवनाच्या लॉबीतच हाणामारी व शिवीगाळ करण्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद त्यावेळी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत उमटले होते. समितीचे अध्यक्ष आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चौकशी अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला. या प्रकरणी समितीने एकूण १० बैठका घेतल्या. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांची साक्ष-पुरावे नोंदविले.
अशा आहेत समितीच्या शिफारशी
या घटनेची दखल घेत समितीने अहवालात काही शिफारशी केल्या आहेत. विधान भवनासारख्या प्रतिबंधित क्षेत्रात गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना विनापडताळणी प्रवेश देऊ नये.
विधान भवनात येणाऱ्या सर्वच अभ्यागतांची सुरक्षा तज्ज्ञ व सल्लागाराच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी.
विधान भवन इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलिस डेटाबेससोबत संलग्नित करण्यात यावी.
विधान भवनाच्या आवारात प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी.