इतिहासातून स्वाभिमान जागृत व्हावा
By Admin | Updated: July 7, 2015 02:27 IST2015-07-07T02:27:46+5:302015-07-07T02:27:46+5:30
आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली होता. परंतु इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थापोटी याला विकृत करण्याचा प्रयत्न केला.

इतिहासातून स्वाभिमान जागृत व्हावा
सरसंघचालक मोहन भागवत : संत गुलाबराव महाराजांच्या जीवन शताब्दी महोत्सवास प्रारंभ
नागपूर : आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली होता. परंतु इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थापोटी याला विकृत करण्याचा प्रयत्न केला. इतिहासातून श्रेष्ठ व्यक्तींच्या मौलिक विचारांचे संस्कार मिळतात. त्यामुळे हे विचार सर्वदूर गेले पाहिजे व इतिहासातून नागरिकांचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. दिव्यचक्षु श्रीगुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्या साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ व ‘सक्षम’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सक्षम’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबेकर, संत गुुलाबराब महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. भय्यासाहेब घटाटे, संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मधुसूदन पेन्ना, ‘सक्षम’चे नागपूर अध्यक्ष सुधाकर इंगोले व सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे ब्रेल ग्रंथ, वैचारिक ग्रंथ व श्रवण ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. सोबतच डॉ. पेन्ना लिखित प्रज्ञाचाक्षुषम् या संस्कृत महाकाव्याचेदेखील लोकार्पण करण्यात आले.
कर्मयोग व भक्तियोगातूनच ज्ञानयोग प्राप्त होतो. संत गुलाबराव महाराजांच्या विचारांमध्ये भक्तीची शक्ती होती. नागरिकांच्या स्वाभिमानाला नवसंजीवनी देण्याची या विचारांमध्ये क्षमता आहे. त्यामुळे त्यांचा प्रसार केलाच पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. संत गुलाबराव महाराजांनी भारतीय संस्कृतीच्या महनीयतेचे विश्वमय दर्शन साहित्यातून घडविले. त्यांचे विचार जगापर्यंत पोहोचले नाही हे जगाचे दुर्दैव आहे, असे मत डॉ. कसबेकर यांनी व्यक्त केले. यावेळी पं. धाकडे यांनी व्हायोलिनवर लघुबंदिशीद्वारे महाराजांना अभिवादन केले. श्रीनिधी घटाटे व अंध कलाकारांद्वारे संत गुलाबराव महाराज रचित ‘आंधळी गौळण’मधील काही गीतांचे सादरीकरण करण्यात आले. अंध कलाकारांनी सादर केलेल्या रचनांनी तर उपस्थितांची मने जिंकली. सुधाकर इंगोले यांनी प्रास्ताविक केले तर रेणुका देशकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
सरसंघचालकांची विरोधकांवर टीका
ब्रिटिशांच्या शिक्षणव्यवस्थेमुळे अनेक नागरिकांमध्ये मानसिक गुलामगिरी निर्माण झाली. प्रज्ञा हरविल्यामुळे अनेकांचा स्वत:च्या विचारांवरील विश्वास हरविला व बाहेरील गोष्टी त्यांना चांगल्या वाटू लागल्या. त्यामुळेच भारतीय धर्मसंस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला किंवा महापुरुषांबाबत चांगली विधाने केली तर लगेच सांप्रदायिकतेचे नाव घेऊन ओरड करण्यात येते. यात राजकीय स्वार्थ तर असतोच, परंतु प्रज्ञा नसलेल्या अनेकांचादेखील यात समावेश असतो, असे प्रतिपादन करीत सरसंघचालकांनी विरोधकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.