अविनाश पोळ : प्रयास - सेवांकुरतर्फे प्रगट मुलाखत

By Admin | Updated: July 14, 2014 02:59 IST2014-07-14T02:59:24+5:302014-07-14T02:59:24+5:30

दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या समस्या

Avinash Poll: Effort - Interview by Sawantu | अविनाश पोळ : प्रयास - सेवांकुरतर्फे प्रगट मुलाखत

अविनाश पोळ : प्रयास - सेवांकुरतर्फे प्रगट मुलाखत

लोकांना लोकांसाठीच कामाला
लावले अन् गावे सुधारलीत
नागपूर
: दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या समस्या जाणून घेता आल्या. यातून ग्रामीण भागातल्या लोकांचे जीवन समजून घेता आले, त्यांचे राहणीमान आणि अपुऱ्या सोयी, स्वच्छतेचा अभाव यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याची जाणीव झाली. आपण किमान यात काय योगदान देऊ शकतो या भावनेने मला ग्रासले आणि प्रत्येक रुग्णाची परिस्थिती आणि त्याच्या घरातल्या सोयीसुविधांचा अभ्यास केला.
यात प्रत्येकाला मी घरात शौचालय आहे का? हा प्रश्न करायचो आणि उत्तर नाहीच असायचे. एका मुद्यावर काम करायला मी प्रारंभ केला. आरोग्य राखायचे असेल तर शौचालय बांधा. लोकांना ते पटले आणि आज सातारा, कोल्हापूर परिसरातील गावात पाच हजारांपेक्षा जास्त शौचालये निर्माण झाली. लोकांना लोकांसाठीच कामाला लावून यातूनच गावात सुधारणा घडत आहेत, असे मत डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.
प्रयास - सेवांकुरतर्फे सातारा येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. अविनाश पोळ यांची प्रकट मुलाखत ‘ आम्ही घडलो, तुम्ही बी घडना’ या अंतर्गत आज बी. आर. ए. मुंडले एज्युकेशन सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृह, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आली. ही मुलाखत प्रयासचे डॉ. अविनाश सावजी यांनी घेतली. याप्रसंगी आपला प्रवास उलगडताना पोळ बोलत होते. मी स्वत: खूप काम केले, असे मी म्हणणार नाही. मी लोकांना मात्र काम करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्या कामातून त्यांनाच कसा लाभ मिळणार आहे, हे पटवून दिले. हे समुपदेशन मला करता आले, ते लोकांना पटले त्यामुळे गावांमध्ये आजही सुधारणा होते आहे. लोकांनी शौचालये बांधल्यावर त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली. कारण शौचालये नसल्याने घाण पसरायची, वातावरण आणि पाणी प्रदूषित व्हायचे, त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर व्हायचा. सध्या हा विषय लोकांना पटलेला आहे, त्यामुळे कुणाकडे शौचालय नसेल तर लोकच त्याला समजावून सांगतात.
हे काम करीत असतानाच गावांमध्ये पाण्याची टंचाई असल्याची बाब लक्षात आली. या विषयाचा अभ्यास केला आणि पाणी साठविण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला. ही टंचाई का निर्माण होते आणि पूर्वी पाणी कसे साठवून ठेवले जायचे, याचाही अभ्यास करत राहिलो.
काही भागात फिरल्यावर अनेक पेशवेकालीन बंधारे पडित असल्याचे लक्षात आले. हे बंधारे पुन्हा सुस्थितीत आणले तर पाण्याची कमतरता दूर करता येईल, हा विश्वास वाटला. प्रयत्न करावा म्हणून कामाला लागलो आणि त्यात यश आले. येथे श्रमाची गरज होती, थोडी पैशांचीही गरज होती. त्यासाठी श्रमदानाला ग्रामस्थांनाच लावले. एक बंधारा कोल्हापुरी पद्धतीने पूर्ण केला आणि पाण्याची साठवणूक व्हायला लागल्यावर लोक आनंदी झाले. याच पद्धतीने जुने बंधारे पुन्हा दुरुस्त करून त्यांना चांगल्या स्थितीत आणले आणि काही नवे बंधारे बांधण्याचे काम केले. यात ग्रामपंचायतीचा सहभाग घेतला. कामे होत गेली आता अनेक गावातला पाण्याचा प्रश्नही मिटतो आहे. केवळ योजना करून अशी कामे होत नाहीत. त्यासाठी लोकांचा सहभाग घेणे आणि इच्छाशक्ती महत्त्वाची असते. आपण जरा डोळसपणे आजूबाजूला पाहिले तर समस्या सुटू शकतात, सोडविता येऊ शकतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
उपस्थितांनी व्यक्त केले कुतूहल
याप्रसंगी पोळ यांनी पॉवर पार्इंट सादरीकरण केले. गावात पाणीच नाही अशावेळी जलसंधारण आणि साठवणूक कशी केली याचे प्रात्यक्षिक त्यांनी एलसीडीद्वारे दाखविल्यावर लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे कळल्यावर अनेकांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. विदर्भातल्या गावांसाठीही काही करा, अशीही मागणी झाली. श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉ. पोळ यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

Web Title: Avinash Poll: Effort - Interview by Sawantu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.