आले २५० इंजेक्शन, रुग्ण ३०० वर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 23:40 IST2021-05-18T23:38:31+5:302021-05-18T23:40:37+5:30
Patients with mucaremycosis in difficulty शहरातील विविध खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ होत आहे, परंतु यावरील ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’ इंजेक्शन मिळेनासे झाले आहे. खासगी रुग्णालयात या आजाराचे सुमारे ३०० वर रुग्ण असताना रविवारी ‘एम्फोटीसिरीन-बी’ ५० एमजीचे २५० इंजेक्शन आले. हे इंजेक्शन किती रुग्णांना मिळाले, याची माहिती कोणाकडेच नाही. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच आहे.

आले २५० इंजेक्शन, रुग्ण ३०० वर : म्युकरमायकोसिसचे रुग्ण अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ होत आहे, परंतु यावरील ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’ इंजेक्शन मिळेनासे झाले आहे. खासगी रुग्णालयात या आजाराचे सुमारे ३०० वर रुग्ण असताना रविवारी ‘एम्फोटीसिरीन-बी’ ५० एमजीचे २५० इंजेक्शन आले. हे इंजेक्शन किती रुग्णांना मिळाले, याची माहिती कोणाकडेच नाही. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच आहे.
म्युकरमायकोसिस आजारावरील ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’, पॉसॅकोनाझोल’ व ‘आयसावॅकॅनाझोल’ आदी औषधांना चार आठवड्यांपूर्वी कमी मागणी होती. अचानक रुग्ण वाढल्याने संपूर्ण राज्यात औषधांची मागणी वाढली. सध्या नागपुरात या औषधांचा साठा निरंक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे आहे. औषधांचा काळाबाजाार होऊ नये, म्हणून त्याच्या खरेदी व विक्रीवर ‘एफडीए’ने नजर ठेवण्याचे सोबतच साठेबाजी व गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत, परंतु त्यानंतरही आलेल्या औषधांचा वाटप योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णांच्या तुलनेत इंजेक्शनचा कमी साठा आल्याने कोणत्या रुग्णाला इंजेक्शन मिळाले, याची माहितीही उपलब्ध नाही. यावरून औषधांचा काळाबाजार तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
चार इंजेक्शनची किंमत काळ्या बाजारात १ लाख २० हजार रुपये
धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाइकाने काळा बाजारात इंजेक्शनची मागणी केली असता, चार इंजेक्शनची किंमत १ लाख २० हजार रुपये सांगितल्याचे रुग्णाच्या नातेवाइकाने ‘लोकमत’ला सांगितले. विशेष म्हणजे, रुग्णाची गंभीरता पाहून एका रुग्णाला दिवसांतून पाच ते सहा इंजेक्शन द्यावे लागतात. तीन ते चार आठवडे इंजेक्शन द्यावे लागत असल्याने, एवढे इंजेक्शन आणणार कुठून, हा प्रश्न आहे.