श्रोत्यांनी अनुभवला नाट्यसंगीताचा गारवा
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:06+5:302014-12-02T00:36:06+5:30
सुसाट वाहणारा वारा अचानक शांत होऊन केवळ आल्हाददायक झुळुक शरीराला स्पर्श करीत राहावी असेच काहीसे आज संगीत चाहत्यांसोबत घडले. जिकडे-तिकडे कानठळ्या बसविणाऱ्या संगीताची चलती

श्रोत्यांनी अनुभवला नाट्यसंगीताचा गारवा
गंधर्वगीते : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आयोजन
नागपूर : सुसाट वाहणारा वारा अचानक शांत होऊन केवळ आल्हाददायक झुळुक शरीराला स्पर्श करीत राहावी असेच काहीसे आज संगीत चाहत्यांसोबत घडले. जिकडे-तिकडे कानठळ्या बसविणाऱ्या संगीताची चलती असताना जुन्याजाणत्या श्रोत्यांना नाट्यसंगीताचा गारवा अनुभवायला मिळाला. निमित्त होते नानासाहेब गोखले यांच्या प्रथम मासिक स्मृतिदिनाचे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘गंधर्वगीते’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विवेक गोखले, रूपाली बक्षी, डॉ. साधना शिलेदार व विशाखा मंगदे यांनी बालगंधर्व यांची अजरामर नाट्यपदे सादर केली. ‘विद्याहरण’ नाटकातील ‘मधु मधुरा... ’ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. साधना शिलेदार यांनी उत्कृष्ट पद्धतीने गायन केले. यानंतर गोखले यांनी ‘मानापमान’ नाटकातील ‘नयने लाजवित...’, विशाखा मंगदे यांनी ‘स्वयंवर’ नाटकातील ‘नरवर कृष्णासमान’, तर रुपाली बक्षी यांनी ‘सौभद्र’ नाटकातील ‘प्रेम नच जाई’ गीत सादर केले. याशिवाय ‘विद्याहरण’ नाटकातील ‘मधुकर वनवन फिरत...’, ‘सौभद्र’ नाटकातील ‘वद जाऊ कुणाला शरण...’, ‘शाकुंतल’मधील ‘वेड्या मना तळमळसी’ अशा विविध श्रवणीय नाट्यगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तबल्यावर राम ढोक, तर संवादिनीवर संजय इंदुरकर यांनी साथसंगत केली. प्रकाश एदलाबादकर यांनी निवेदन केले. प्रारंभी प्रमुख अतिथी नीला फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर बसोलीचे चंद्रकांत चन्ने उपस्थित होते. (प्रतिनिधी)