सोनिया व राहुल गांधींच्या सभेकडे विदर्भवाद्यांचे लक्ष
By Admin | Updated: April 4, 2016 05:47 IST2016-04-04T05:47:18+5:302016-04-04T05:47:18+5:30
अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर

सोनिया व राहुल गांधींच्या सभेकडे विदर्भवाद्यांचे लक्ष
नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपुरात कस्तुरचंद पार्कवर सभा होत आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या सभेत काँग्रेस पक्षश्रेष्ठी काही सूतोवाच करतात काय याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे. सोनिया व राहुल गांधी यांनी विदर्भाला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्याची तयारी विदर्भवाद्यांनी चालविली आहे.
विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी सातत्याने विदर्भाच्या मागणीचे समर्थन केले आहे. मात्र, अ.भा. काँग्रेस समितीकडून या मागणीला कधीच पाठबळ मिळालेले नाही. या विषयाला नेहमीच बगल दिली. आता काँग्रेस नेते विदर्भासाठी भाजपकडे बोट दाखवित आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींची विदर्भाबाबत काय भूमिका आहे हे त्यांनी विदर्भातील या सभेत स्पष्ट करावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. तर ज्यांनी विदर्भाची स्वप्न दाखवून मते घेतली, सत्ता मिळवली. त्या भाजपा नेत्यांनी आता शब्द पाळावा. विदर्भ राज्य देण्याचा निर्णय घेणे हे केंद्रात सत्ता असलेल्यांच्या हाती आहे. भाजपने लोकसभेत वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रस्ताव आणावा. काँग्रेस त्याला समर्थन देईल. त्यासाठी आम्ही पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना विनंती करू. समर्थन दिले नाही तर काँग्रेस तोंडघशी पडेल. विदर्भातील लोकांना सत्यस्थिती कळेल, अशी भूमिका घेत भाजपचे पाय भाजपच्याच गळ्यात बांधले आहेत.
काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार लोकमतशी बोलताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भासाठी आंदोलने सुरू आहेत. अॅड. श्रीहरी अणेंचे आंदोलन हे त्याचाच एक भाग आहे. काँग्रेस श्रेष्ठींचा विदर्भाला विरोध नाही. द्विग्विजयसिंग यांनीही विरोध केला नाही. त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर हा विषय सोपविला व विदर्भातील काँग्रेस नेते वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. वेगळे राज्य देण्याचा निर्णय सत्तेत असणाऱ्यांनी घ्यायचा असतो. आता काँग्रेस सत्तेत नाही. काँग्रेस सत्तेत होती तेव्हा दिलेल्या आश्वासनानुसार तेलंगना राज्य दिले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द पाळावा. केवळ आंदोलनांनेच राज्य निर्माण होते असे नाही. लोकशाहीत मागणीची दखल घेतली जावी. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणाचा विकास पाहून आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे भाजपने आता निराशा न करता लेगच विदर्भ राज्याचा प्रस्ताव संसदेत मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.(प्रतिनिधी)