नागपूर : शेतकरी आंदोलनात नागपूर रेल्वेस्थानकावर ३० ते ४० जणांचा मोर्चा रेल्वे रोको करण्यासाठी दुपारी १ वाजता आला. परंतु रेल्वे सुरक्षा दल आणि शहर पोलिसांनी या जमावाला आत जाऊ दिले नाही. अर्धा तास आंदोलन केल्यानंतर आंदोलनकर्ते निघून गेले. यामुळे एकाही रेल्वेगाडीला उशीर झाला नाही.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी देशभरात रेल्वे रोको आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. आरपीएफने ड्यूटीची वेळ वाढवून ८ ऐवजी १२ तास केली होती. नागपूर, अजनी, इतवारी या रेल्वेस्थानकांवर तसेच लेव्हल क्रॉसिंग गेटवर जवानांना तैनात केले होते. नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी १ वाजता ३० ते ४० संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलनकर्ते पोहोचले. आधीच शहर पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला सूचना असल्यामुळे या आंदोलनकर्त्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर रोखण्यात आले. १०० पेक्षा अधिक पोलीस तेथे उपस्थित होते. आंदोलकांनी नारेबाजी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर परिस्थिती सामान्य झाली. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातल्यानंतर आंदोलनकर्ते निघून गेले. यामुळे कोणत्याच रेल्वेगाडीला उशीर झाला नाही. नागपूर विभागातही कुठेच रेल्वे रोको करण्यात आले नसल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
..............