स्टंटबाजीवरून नागपुरात पुन्हा एकाच्या हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 00:15 IST2021-05-26T00:13:17+5:302021-05-26T00:15:16+5:30
Attempt to Murder वेगात दुचाकी चालविण्याच्या वादातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री थरारक हत्याकांड घडले. या प्रकरणाच्या वृत्ताची शाई सुकायची असतानाच सक्करदऱ्यात सोमवारी रात्री याच कारणावरून तिघांनी एकाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले.

स्टंटबाजीवरून नागपुरात पुन्हा एकाच्या हत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगात दुचाकी चालविण्याच्या वादातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री थरारक हत्याकांड घडले. या प्रकरणाच्या वृत्ताची शाई सुकायची असतानाच सक्करदऱ्यात सोमवारी रात्री याच कारणावरून तिघांनी एकाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. जहीर अहमद मोबिन अहमद असे जखमीचे नाव आहे. जहीर श्यामबाग, गवंडीपुरा येथे राहतो. सोमवारी रात्री १०.४५ वाजता तो त्याच्या मित्रासह सक्करदऱ्यातील ग्राउंडजवळ गप्पा करत होता. तेथे साई लांजेवार नामक आरोपी स्टंटबाजी करत जोरात दुचाकी चालवत होता. त्यामुळे गुंजन नामक तरुणाने त्याला हटकले. यावेळी आरोपी लांजेवारने गुंजनला मारहाण केली.
काही वेळानंतर तो दोन साथीदारांना घेऊन आला. या तिघांनी गुंजन आणि जहीरला शिवीगाळ करून त्यांच्यावर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे जहीरच्या डोक्याला दगड लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जहीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोबीन अहमद यांच्या तक्रारीवरून आरोपी लांजेवार आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
कोतवालतील आरोपींना पीसीआर
स्टंटबाजी करण्याच्या वादातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून सैफ अली उर्फ शाहरुख शौकत अली या २६ वर्षीय तरुणाची हत्या करणारे आरोपी बाबल्या उर्फ लक्ष्मण दशरथ हिवराळे, विनायक इसकापे आर. के. पटेल आणि बंटी जैस या चौघांना न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी आरोपींकडून शाहरुखची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार जप्त केली. आरोपींनी कट-कारस्थान करूनच शाहरूखची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हे हत्याकांड बाजूच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, आरोपींविरुद्ध तो सबळ पुरावा ठरणार आहे.