काेराेना विधवांना ‘भाऊ’आधार देण्याचा प्रयत्न ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST2021-08-22T04:09:44+5:302021-08-22T04:09:44+5:30

नागपूर : कोरोना महामारीने राज्यभरात २०,००० पेक्षा जास्त महिलांचे कुंकू पुसले आहे. कर्त्या माणसाच्या जाण्याने पाेरक्या झालेल्या कुटुंबाचा आधार ...

Attempt to give 'brother' support to Kareena widows () | काेराेना विधवांना ‘भाऊ’आधार देण्याचा प्रयत्न ()

काेराेना विधवांना ‘भाऊ’आधार देण्याचा प्रयत्न ()

नागपूर : कोरोना महामारीने राज्यभरात २०,००० पेक्षा जास्त महिलांचे कुंकू पुसले आहे. कर्त्या माणसाच्या जाण्याने पाेरक्या झालेल्या कुटुंबाचा आधार झालेल्या या महिलांच्या आयुष्यात एकटेपणाची भावना निर्माण हाेण्याची शक्यता आहे. या भगिनींना मानसिक आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. अशा महिलांच्या घरापर्यंत जाऊन ‘रक्षाबंधन’ भेट देण्याचे अभियान आज राज्यभर राबविण्यात येत आहे.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्यावतीने समन्वयक हेरंभ कुळकर्णी यांच्या आवाहनानंतर २२ जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. काेराेनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी समितीच्या माध्यमातून १५० च्यावर संस्था जुळल्या आहेत. अशा महिलांवे सर्वेक्षण करण्यापासून ते शासनाच्या वेगवेगळ्या याेजनांचा लाभ मिळवून देणे व अशा निराधार कुटुंबाच्या पुनर्वसनाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे चालविले आहे. या प्रयत्नांमुळेच राज्य शासनाने निराधार बालक व काेराेना विधवांसाठी वेगवेगळ्या याेजना आखल्या आहेत.

सणासुदीच्या दिवशी मात्र त्यांना एकटेपणाची जाणीव हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारे सण या कुटुंबाच्या घरी जाऊन साजरा करण्याचे अभियान राबविले जात असून रक्षाबंधन पर्वावर याची सुरुवात करण्यात आली. जिल्हा व तालुका स्तरावर असलेले या संस्थांचे कार्यकर्तेे गावाेगावी अशा एकल महिलांच्या घरी जाणार आहेत. स्थानिक लाेकप्रतिनिधी, सरपंच, पाेलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि शासकीय अधिकाऱ्यांनाही साेबत घेतले जाणार आहे. आपल्या परिसरातील कोरोना विधवा असेल किंवा इतर कोणतीही विधवा किंवा एकल महिला असेल अशा बहिणीच्या घरी जाऊन आपण रक्षाबंधन साजरे केले तर त्या महिलेला नक्कीच आधार वाटेल. तुम्ही एकट्या नाहीत तर सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे असा संदेश देण्यासाठीच हे अभियान आयाेजित केल्याची भावना हेरंभ कुळकर्णी यांनी व्यक्त केली. समितीचे सर्व कार्यकर्ते गावागावात अशा रीतीने रक्षाबंधन साजरे करणार आहेत.

शासन स्तरावर विधवा महिला व निराधार कुटुंबांसाठी नियाेजन केले जात असले तरी हवी तशी आर्थिक मदत या कुटुंबापर्यंत पाेहचल्याचे दिसत नाही. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी समितीचे प्रयत्न आहेत. काही प्रमाणात यश आले पण अजून माेठा पल्ला गाठायचा आहे. या उपक्रमातून त्यांना भावनिक आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- हेरंभ कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Attempt to give 'brother' support to Kareena widows ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.