फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: November 23, 2015 02:40 IST2015-11-23T02:40:45+5:302015-11-23T02:40:45+5:30
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले या दाम्पत्याने सर्व समाजबांधवांची प्रगती व उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याला तोड नाही.

फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न
मुख्यमंत्री : माळी समाजाचा युवक-युवती परिचय मेळावा
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले या दाम्पत्याने सर्व समाजबांधवांची प्रगती व उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याला तोड नाही. खऱ्या अर्थाने त्यांना भारतरत्न मिळणे हा भारतरत्न पदाचा सन्मान होय. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे, अध्यक्ष संभाजी पगारे, प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, फुले दाम्पत्याला योग्य वेळी त्यांना हा सन्मान सरकारकडून देण्यात येईल. यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. फुले यांच्या विचारावर आमचे शासन काम करते. त्यांच्या आदर्शाचा आधार घेऊ न दीनदलित, शोषित-पीडित यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच माळी समाजाचे राज्यात चांगले संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजाकरिता दिशादर्शक उपक्रम राबविला जात आहे.
यावेळी अविनाश ठाकरे, संभाजी पगारे, शंकरराव लिंगे, शहर कार्याध्यक्ष गोविंद वैरागडे व कार्याध्यक्ष ज्ञानेशवर लोखंडे आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात विविध प्रस्ताव पारित करून फुले दाम्पत्याला भारतरत्न हा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. वधू-वर सूचक मेळाव्यात ५५० युवक-युवतींनी नोंदणी के ली होती. यातील ३०० जणांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गिरडकर, शहर सरचिटणीस कैलास जामगडे आदी मान्यवर उपस्थित होेते. या मेळाव्याला युवक-युवती व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. संचालन प्रा. कविता भोपळे यांनी तर आभार मधुसूदन देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)