नागपूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; हल्लेखोर फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 21:18 IST2022-12-26T21:18:23+5:302022-12-26T21:18:59+5:30
Nagpur News कुही तालुक्यातील राजोला येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंकिता उमराव वैद्य (२२ वर्ष) रा. राजोला ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; हल्लेखोर फरार
नागपूर : कुही तालुक्यातील राजोला येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंकिता उमराव वैद्य (२२ वर्ष) रा. राजोला ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. रितेश राऊत (२४ वर्ष) रा. डोडमा, ता. कुही व सूर्या जौजाळ (२५) रा. कळमना अशी हल्लेखोरांची नाव आहेत. तरुणीवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी २ वाजताच्या सुमारास दोन युवक राजोला येथे आले. ते अंकिताच्या घरात शिरले. आई-वडील शेतात गेल्याने अंकिता घरी एकटीच होती. रितेशने तिच्यावर चाकूने मानेवर,पोटावर व पायावर वार करून जखमी केले. अंकिताने आरडाओरड करताना ग्रामस्थ तिथे पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत अंकिता विव्हळत होती. नागरिकांना बघताच हल्लेखोर बाईकवरून पळून गेले.
अंकिता ही भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे काही महिन्यापासून एका खासगी नर्सिंग संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण झाल्याने लवकरच ती नागपूर येथील लता मंगेशकर कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार होती. अंकिता ही रविवारीच काही कामानिमित्त राजोला येथे घरी आली होती.
गत काही दिवसापासून रितेश हा अंकिताच्या मागे लागला होता. त्याचे अंकितावर एकतर्फी प्रेम असल्याचे समजते. एकतर्फी प्रेमातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहीती मिळताच वेलतूर पोलिस राजोला येथे दाखल झाले. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जि. प. सदस्य अरुण हटवार, सरपंच प्रियंका वैद्य यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.