पाटबंधारे कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:38+5:302021-02-09T04:10:38+5:30
बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : सिंचन व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाला विशेष महत्त्व आहे. सावनेर येथील उपविभागीय ...

पाटबंधारे कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : सिंचन व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाला विशेष महत्त्व आहे. सावनेर येथील उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाला सावनेर, कळमेश्वर व पारशिवनी हे तीन तालुके जाेडले आहेत. त्या कार्यालय व तालुक्यांचा कार्यभार सांभाळण्यासाठी विविध कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकूण १०१ पदे मंजूर केली आहेत. यातील केवळ २९ कर्मचारी या कार्यालयांतर्गत कार्यरत असून, ७२ विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयाचा कार्यभार सांभाळताना कार्यरत कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक हाेत आहे.
या कार्यालयांतर्गत सध्या १०१ पैकी २९ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला आहे. बदली आणि सेवानिवृत्तीनंतर शासनाने या कार्यलयातील रिक्त पदांवर नवीन कर्मचाऱ्यांनी नियुक्ती न केल्याने येथील कर्मचाऱ्यांचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एका कर्मचाऱ्याला किमान तीन ते चार टेबलची अर्थात कर्मचाऱ्यांची कामे सांभाळावी लागत असल्याने कार्यरत कर्मचारीही त्रासले आहेत. कामाचा मानसिक ताण वाढत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
वास्तवात, या कार्यालयात उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ लिपिक, मोजणीदार, टंकलेखक, कालवा निरीक्षक, दफ्तर कारकून, वाहनचालक, नाईक, कालवा तपासणीस, संदेशक, शिपाई, चौकीदार, कालवा चौकीदार आदी पदे मंजूर आहेत. यातील बहुतांश महत्त्वाची पदे पाच ते सहा वर्षांपासून रिक्त असल्याने एकीकडे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत असून, दुसरीकडे कामे रखडली जात असल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे.
....
ही आहेत रिक्त पदे
आकृतिबंधानुसार पाटबंधारे सावनेर शाखेत २२ पदे मंजूर असून, १९ पदे रिक्त असल्याने तीन कर्मचारी कार्यरत आहेत. काेलार शाखा-१ मध्ये २२ मंजूर पदांपैकी १७ पदे रिक्त असल्याने पाच कर्मचारी, काेलार शाखा-२ मध्ये २२ मंजूर कर्मचाऱ्यांपैकी १७ पदे रिक्त असल्याने पाच कर्मचारी, खापा शाखेत २२ मंजूर पदांपैकी १७ पदे रिक्त असल्याने पाच कर्मचारी, उपविभाग सावनेर कार्यालयात १३ पदे मंजूर असून, यातील दाेन पदे रिक्त असल्याने ११ कर्मचारी कामाचा डाेलारा सांभाळत आहेत.
....
सिंचनात अडचणी
नरेंद्र निमजे सावनेर उपविभागीय पाटबंधारे कार्यालयात उपविभागीय अभियंतापदी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अजनी, नागपूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील सर्वे उपविभागाचा प्रभार आहे. या दाेन कार्यालयामधील काम सांभाळताना त्यांचीही फरफट हाेत आहे. या उपविभागांतर्गत एकूण २० प्रकल्प असून, यात सावनेर तालुक्यातील चार मध्यम व आठ लघु, कळमेश्वर तालुक्यातील दाेन मध्यम व चार लघु तसेच पारशिवनी तालुक्यातील दाेन मध्यम व दाेन लघु प्रकल्पांचा समावेश आहे. कालवा निरीक्षक, माेजणीदार व दफ्तर कारकून ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने सिंचन कार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
...
शासन खासगीकरणावर भर देत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती केली जात नसल्याने एका कर्मचाऱ्याला वेगवेगळे टेबल सांभाळावे लागत आहेत. त्यातच मंत्र्यांचे दाैरे, निवडणुकीची कामे अशी इतर कामेही पूर्ण करावी लागतात. हे सर्व करताना कामाचा ताण वाढत आहे.
- नरेंद्र निमजे,
उपविभागीय अभियंता, सावनेर.