सहायक कामगार आयुक्तांना ३० हजारांची लाच घेताना ‘सीबीआय’कडून रंगेहाथ अटक
By योगेश पांडे | Updated: March 14, 2023 20:57 IST2023-03-14T20:57:03+5:302023-03-14T20:57:41+5:30
Nagpur News सहायक कामगार आयुक्त विनयकुमार जैसवालला ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली. ३० हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

सहायक कामगार आयुक्तांना ३० हजारांची लाच घेताना ‘सीबीआय’कडून रंगेहाथ अटक
नागपूर : सहायक कामगार आयुक्त विनयकुमार जैसवालला ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली. ३० हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नागपुरातील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
वेकोलितून निवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात ‘सीबीआय’कडे तक्रार केली होती. दोन्ही कर्मचारी २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मात्र त्यावेळी त्यांनी सरकारी निवासस्थान रिकामे न केल्याने ‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम थकीत होती. संबंधित रक्कम वेकोलिने कामगार आयुक्त कार्यालयाकडे वर्ग केली. हे प्रकरण जैसवालकडे होते. कर्मचाऱ्यांनी वेकोलिकडून ‘एनओसी’ आणल्याने त्यांना ‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम देण्यात यावी, असे वेकोलिने कामगार आयुक्त कार्यालयाला कळविले. मात्र ‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम पाहिजे असेल तर प्रत्येकी ३० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी जैसवालने कर्मचाऱ्यांकडे केली होती. कर्मचाऱ्यांनी इतके पैसे देणे शक्य नसल्याचे म्हटल्यावर प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचे ठरले.
जैसवालने ही रक्कम ‘युपीआय’च्या माध्यमातून मागितली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने कर्मचाऱ्यांनी ‘सीबीआय’कडे तक्रार केली. ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यानंतर सापळा रचून लाच स्वीकारताना जैसवालला अटक करण्यात आली. जैसवालविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या पदावरील अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. सीबीआयचे नागपूर प्रमुख व डीआयजी एम.एस.खान यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली असून उपअधीक्षक दिनेश तळपे हे पुढील तपास करत आहेत.