लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांसारख्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासह अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी नागपूर जिल्ह्याने आपला वेगळा ठसा निर्माण केला. जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुख यांचा योग्य समन्वय, अधिकारी आणि कर्मचारी यांची दक्षता, पोलिस विभागातील सर्वांनी घेतलेली कर्तव्य तत्पर भूमिका, यामुळे नागपूरला यश मिळाले, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले.
नियोजन भवन येथे सोमवारी विधानसभा निवडणुकीत स्वीप उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. यावेळी निवडणूकीत प्रक्रियेत उत्कृष्ट सहभागासाठी जिल्हा प्रशासनाला असलेला सन्मान डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस विभागाला देण्यात येणाऱ्या सन्मान पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते स्विकारला. स्वीपच्या उत्कृष्ट संयोजन आणि संचलनाबद्दल जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्वीप टीम समन्वयासाठी सहआयुक्त अजय चारठाणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, मनपा उपायुक्त रंजना लाडे, समाज कल्याण व विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा उद्योग अधिकारी शिव कुमार मुद्दमवार, एलडीएम मोहीत गेडाम यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संदीप भस्के, स्वाती देसाई, सुरेश बगळे, आकाश अवताडे, सचिन गोसावी, प्रियेश महाजन, तहसीलदार कल्याण कुमार दहाट, जितेंद्र शिकतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, बालासाहेब यावले, चेतन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनाही सन्मानित करण्यात आले. संचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केले, तर आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.
"सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागपूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर सन्मानित होण्याचा मान मिळाला. जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख अर्थात, जिल्हाधिकारी या नात्याने आम्ही तो सन्मान स्विकारला. मात्र, यात आपल्या सर्वांचे योगदान आहे. या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना सन्मानित करता आले, याचे समाधान आहे."- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.