आश्रमशाळा, वसतिगृहाच्या धान्यासाठी केंद्राकडे साकडे
By Admin | Updated: July 1, 2014 00:50 IST2014-07-01T00:50:22+5:302014-07-01T00:50:22+5:30
राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृह आदी संस्थांना देण्यात येत असलेला रेशन धान्याचा पुरवठा बंद करण्यात आल्याने वसतिगृहांची चिंता वाढली आहे. त्यामुळे होत असलेला धान्य पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र

आश्रमशाळा, वसतिगृहाच्या धान्यासाठी केंद्राकडे साकडे
अन्नपुरवठा मंत्र्यांची माहिती : दिल्लीत बैठक
अचलपूर : राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृह आदी संस्थांना देण्यात येत असलेला रेशन धान्याचा पुरवठा बंद करण्यात आल्याने वसतिगृहांची चिंता वाढली आहे. त्यामुळे होत असलेला धान्य पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाला मागणी करण्यात आली असून त्यासंदर्भात दिल्ली येथे पुढच्या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
परतवाडा येथील शासकीय विश्रामगृहावर वझ्झर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. जानेवारी महिन्यापासून केंद्राकडून राज्यातील अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह व कल्याणकारी योजना चालविणाऱ्या संस्थांना पुरविल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला. बदल्यात कुठल्याच प्रकारच्या रोख अनुदानाची तरतूद नसल्याने या सामाजिक संस्था हवालदिल झाल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निवासी संस्थांना भेडसावत आहे. संपूर्ण राज्यात या संदर्भात ओरड सुरू असून या प्रश्नांची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात केंद्रीय पुरवठा मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक असून त्यात हा मुद्दा मांडला जाणार आहे.