"आशाताईंनी स्वतः बाजारात जाऊन माझ्या आवडीच्या भाज्या आणल्या आणि .. " सरसंघचालकांसोबत भेटीच्या आठवणी
By निशांत वानखेडे | Updated: April 13, 2026 15:46 IST2026-04-13T15:34:25+5:302026-04-13T15:46:50+5:30
Nagpur : सरसंघचालक मोहन भागवत एकदा मुंबईच्या दौऱ्यावर असताना नागपूर भेटीत ठरल्याप्रमाणे ते आशाताईच्या घरी गेले. या भेटीसाठी आशाताईंनी संपूर्ण तयारी केली होती.

" Ashatai herself went to the market and brought my favorite vegetables and.." Memories of meeting with the Sarsanghchalak
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत एकदा मुंबईच्या दौऱ्यावर असताना नागपूर भेटीत ठरल्याप्रमाणे ते आशाताईच्या घरी गेले. या भेटीसाठी आशाताईंनी संपूर्ण तयारी केली होती. स्वतः बाजारात जाऊन मोहन भागवत यांच्या आवडीच्या भाज्या आणल्या आणि स्वतः जेवण तयार करून सरसंघचालकांसह आम्हा सर्वांना जेवण वाढले सुद्धा. संगीत दुनियेतील एक ध्रुवतारा, एवढी मोठी व्यक्ती, पण आयुष्यात एवढा साधेपणा. हे सारं काही अविस्मरणीय होते. आम्ही त्या भेटीने भारावून गेलो होतो.
नागपूरचे प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी यांनी आशाताई आणि सरसंघचालकांच्या दोन भेटीच्या आठवणी सांगितल्या. जून २०२४ ला मोहन भागवत मुंबईला गेले असता, त्यांची व आशाताईची धावती भेट झाली होती. मंगेशकर कुटुंबीयांप्रमाणे आशाताईचीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अपार श्रद्धा होती. मोहनजींनी त्यांना नागपूर भेटीचे आमंत्रण दिले होते.
त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आशाताई नागपूरला आल्या होत्या. त्यांनी संघ मुख्यालयी जाऊन सरसंघचालकांची भेट घेतली. त्यावेळी एक कलाकार म्हणून मीसुद्धा या खासगी भेटीत सहभागी होतो. दीड-दोन तास चाललेल्या या भेटीदरम्यान देशातील परिस्थिती आणि इतर गोष्टींवर चर्चा झाली, पण मुख्य विषय संगीत हाच होता. आशाताईंनी यावेळी काही भजने व जुनी गाणी गायली होती. यानंतर आशाताईनी मोहनर्जीना मुंबईला त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले.
पुढे सरसंघचालकांना मुंबई प्रवासाचा प्रसंग आला आणि तेसुद्धा आमंत्रणाचा सन्मान ठेवत आशाताईंच्या घरी गेले होते. त्यावेळी अनुभवलेला आशाताईंचा साधेपणा अवर्णनीय असाच आहे. त्यांनी स्वतः भाजी आणायला जाणे, स्वतः स्वयंपाक बनविणे आणि स्वतः वाढूनही देणे, हे केवळ अविस्मरणीय असेच आहे. या भेटीदरम्यान त्यांनी संगीत क्षेत्रातील अनेक आठवणी सांगितल्या.
साधेपणाने जगणाऱ्या आशाताई दिव्य व्यक्तिमत्त्व
संगीताच्या सुवर्ण काळातील त्यांचा प्रवास आणि आयुष्यातील चांगल्या-वाईट आठवणींनाही उजाळा दिला. नागपूर आणि कवी सुरेश भट यांची आशाताईंना विशेष ओढ होती आणि त्यांच्या गीतांनीच ही भेट पूर्ण झाली. लता मंगेशकर यांसारख्या वटवृक्षाखाली राहूनही आशाताईंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, हे कलेचे उत्तुंग उदाहरण आहे. एवढे मोठे व्यक्तिमत्व असूनही एवढ्या साधेपणाने जगणाऱ्या आशाताई म्हणजे खरंच दिव्य व्यक्तिमत्त्व होय, अशी भावना अमर कुळकर्णी यांनी व्यक्त केली.