युगचे अपहरण केले अरविंद सिंगने

By Admin | Updated: March 21, 2015 02:35 IST2015-03-21T02:35:39+5:302015-03-21T02:35:39+5:30

युगचे अपहरण गुरुवंदना अपार्टमेंट येथे लाल रंगाच्या टी शर्टमध्ये जांभळ्या रंगाच्या स्कूटीवर आलेल्या अरविंद सिंग याने केले होते, ...

Arvind Singh kidnapped the era | युगचे अपहरण केले अरविंद सिंगने

युगचे अपहरण केले अरविंद सिंगने

नागपूर : युगचे अपहरण गुरुवंदना अपार्टमेंट येथे लाल रंगाच्या टी शर्टमध्ये जांभळ्या रंगाच्या स्कूटीवर आलेल्या अरविंद सिंग याने केले होते, अशी बेधडक साक्ष वॉचमन अरुण मेश्राम याने शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक अपहरण -खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिली.
सरकारी वकील ज्योती वजानी यांनी घेतलेल्या सरतपासणीत तो म्हणाला की, घटनेच्या सहा महिन्यापूर्वी मी तिवारी सिक्युरिटी कंपनीत वॉचमन म्हणून रुजू झालो होतो. गुरु वंदना अपार्टमेंट येथे आपणास नेमण्यात आले होते. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत आपली ड्युटी असायची. मी डॉ. चांडक आणि त्यांच्या कुटुंबाशी परिचित आहे. त्यांच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव धृव तर दुसऱ्याचे नाव युग होते. डॉ. चांडक आणि त्यांच्या पत्नी दंत चिकित्सक आहेत. त्यांचे क्लिनिक आहे. क्लिनिकचे कर्मचारी गणवेश म्हणून लाल रंगाचा टी शर्ट घालत होते.
१ सप्टेंबर २०१४ रोजी मी गुरु वंदना अपार्टमेंट येथे सकाळी ९ वाजेपासूनच ड्युटीवर होतो. गणेशोत्सवाचे दिवस होते. अपार्टमेंटच्या आवारात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर आपली बसण्याची जागा होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास २१-२२ वयोगटातील एक मुलगा जांभळ्या रंगाच्या स्कूटीवर आला. त्याने लाल रंगाचा टी शर्ट घातलेला होता. त्याने आपणास डॉ. चांडक यांचा मुलगा युग घरी परतला काय, असे विचारले होते. फूटपाथनजीक त्याने आपली स्कूटी पार्क केली होती. त्याने आपणास फूटपाथवरूनच युगबद्दल विचारले होते. तो तोंडाला स्कार्फ बांधून होता. माझ्याशी बोलताना त्याने स्कार्फ काढला होता. मी त्याला डॉक्टर साहेबाच्या घरी जाऊन पाहून घे, असे म्हटले होते. परंतु तो फूटपाथवरच होता. दरम्यान याच इमारतीमध्ये राहणारे छाबरिया हे आपल्या घरी परतले होते. काही वेळानंतरच युग शाळेतून घरी परतला होता. त्या मुलाने युगला आवाज दिला होता. युग हा शाळेचा गणवेश आकाशी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाच्या हाफ पँटवर होता. या दोघांमध्ये काही तरी बोलचाल झाली होती. त्यानंतर युग हा माझ्याकडे आला होता.
स्कूलबॅग माझ्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवून वडिलाच्या क्लिनिकमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने स्कूलबॅग घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो स्कूटीवाल्या मुलाकडे गेला होता. युग स्कूटीवर बसला होता. स्कूटीचालक मुलाने स्कार्फ तोंडाला बांधला होता. त्यानंतर ते दोघेही छापरूनगर चौकपरिसराच्या दिशेने निघून गेले होते.
युगची स्कूलबॅग त्याच्या घरी पोहोचविण्यासाठी गेलो असता सुषमा नावाच्या मोलकरणीने युगबाबत विचारले होते. तिला युग हा क्लिनिकच्या एका कर्मचाऱ्यासोबत गेल्याचे सांगितले होते.
काही वेळानंतर चांडक यांचा ड्रायव्हर आला होता. त्याने युगबद्दल चौकशी केली होती. त्यालाही क्लिनिकच्या कर्मचाऱ्याने युगला नेल्याचे सांगितले होते. ड्रायव्हरने मोबाईलवरून डॉ. चांडक यांना सांगितले होते. लागलीच चांडक घरी परत आले होते. त्यांच्या पत्नीही घाई गडबडीने घरी परत आल्या होत्या. त्यांना आपण सर्वकाही सांगितले होते. सायंकाळी ६ वाजता पोलीस आले होते. त्यांनाही आपण याबाबत सांगितले होते.
२० दिवसानंतर आपणास पोलिसांनी नोटीस देऊन कारागृहात आरोपीच्या ओळखपरेडसाठी बोलावले होते. २५ सप्टेंबर रोजी मी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गेलो होतो. सात जणांना एका रांगेत उभे ठेवून आपणास घटनेच्या दिवशी जांभळ्या रंगाच्या स्कूटीने गुरु वंदना अपार्टमेंट येथे येऊन युगचे अपहरण करणाऱ्यास ओळखण्यास सांगण्यात आले होते. रांगेत चौथ्या क्रमांकावर उभ्या असलेल्या मुलास ओळखले होते. अधिकाऱ्याने या मुलास त्याचे नाव विचारले असता त्याने अरविंद सिंग, असे सांगितले होते.
न्यायालयात या साक्षीदाराची उलटतपासणी बाचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल आणि अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय यांनी घेतली. न्यायालयात फिर्यादी डॉ. चांडक यांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा, बचाव पक्षाच्या वकिलांचे सहाय्यक अ‍ॅड. राजेश्री वासनिक, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय उपस्थित होते.
आज संगणक तज्ज्ञ हितेश राठोड यांची उलटतपासणी साक्ष बचाव पक्षाकडून घेण्यात आली. आता या खटल्याची सुनावणी ८ एप्रिलपासून होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Arvind Singh kidnapped the era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.