अरविंद सिंगने दिली होती गुन्ह्याची कबुली
By Admin | Updated: January 19, 2015 00:50 IST2015-01-19T00:50:26+5:302015-01-19T00:50:26+5:30
अरविंद सिंग याने आपल्यासमक्ष गुन्ह्याची कबुली देऊन युगच्या अंगातील शाळेचा निळ्या रंगाचा टी शर्ट ज्या नाल्यात फेकला ते ठिकाण दाखविले होते, अशी साक्ष पंच साक्षीदार सुनील अजितमल

अरविंद सिंगने दिली होती गुन्ह्याची कबुली
न्यायालय : पंच सुनील कोठारी यांची साक्ष
नागपूर : अरविंद सिंग याने आपल्यासमक्ष गुन्ह्याची कबुली देऊन युगच्या अंगातील शाळेचा निळ्या रंगाचा टी शर्ट ज्या नाल्यात फेकला ते ठिकाण दाखविले होते, अशी साक्ष पंच साक्षीदार सुनील अजितमल कोठारी यांनी शनिवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिली.
आपली सरतपासणी साक्ष देताना कोठारी म्हणाले की, १० सप्टेंबर २०१४ रोजी आपण पंच साक्षीदार होण्याची सहमती दिल्यानंतर पोलीस कोठडीतील एका मुलाला पोलीस निरीक्षक जयस्वाल यांच्या कक्षात आणण्यात आले होते. त्या मुलाने स्वत:चे नाव अरविंद सिंग, असे सांगितले होते. तो २३ वर्षांचा होता.
अरविंद सिंग याने गुन्ह्याची कबुली दिली होती. गुन्हा केल्यानंतर मृताच्या अंगातील निळ्या रंगाची टी शर्ट काढून तो एका नाल्यात फेकला होता, असे त्याने उघड केले होते आणि नाला दाखविण्याची तयारी दर्शविली होती. (प्रतिनिधी)
लोणखैरीच्या नाल्याजवळ नेले
अरविंद सिंग याचा कबुलीजबाब नोंदवण्यात आल्यानंतर आम्ही पंच, पोलीस आणि आरोपी सरकारी वाहनाने घटनास्थळाकडे निघालो होतो. पोलिसांनी स्विपर लोकांना बोलावून तयारीत ठेवले होते. आरोपी अरविंद सिंग याने आम्हाला लोणखैरी भागातील नाल्याजवळ नेले होते. याच ठिकाणी नाल्यात आपण मृताच्या अंगातील शाळेचा टी शर्ट फेकल्याचे सांगितले होते.
नाल्यातून काढला युगचा टी शर्ट
पोलीस निरीक्षक जयस्वाल यांनी स्विपर लोकांना नाल्याच्या पाण्यात आणि झुडुपात कपड्याचा शोध घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी अरविंद सिंग याच्या सांगण्यावरून त्या स्विपर लोकांनी मृताच्या कपड्याचा शोध घेणे सुरू केले होते. त्यानंतर तासाभरात एका स्विपरने नाल्याच्या पाण्यातून निळ्या रंगाचा टी शर्ट काढून तो आम्हाला दाखविला होता. आरोपीने आपण नाल्यात फेकलेला टी शर्ट हाच असल्याचे सांगितले होते. या साक्षीदाराने न्यायालयात अरविंद सिंग तसेच नाल्यातून जप्त करण्यात आलेला टी शर्ट ओळखला.
अरविंद सिंगचे नाव माहीत नव्हते
आपली उलटतापसणी साक्ष देताना कोठारी म्हणाले की, हे खरे आहे की, आरोपीने स्वत:चे नाव अरविंद सिंग असल्याचे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात त्याचे नाव समजले. तुम्हाला युग चांडक नावाच्या मुलाच्या खुनाच्या प्रकरणात पंच व्हायचे आहे, हे पोलिसांनी उघड केले नव्हते. हे खरे नाही की, गुन्ह्यातील एका आरोपीला निळ्या रंगाचा एक टी शर्ट सादर करण्याची इच्छा आहे, असे पोलीस निरीक्षक जयस्वाल यांनी स्पष्ट करून आम्हाला पंच केले. हे खरे नाही की, पोलीस निरीक्षकाच्या कक्षात आणण्यापूर्वीच आपणाला अरविंद सिंगचे नाव माहीत होते.
फौजदार गोसावी यांची साक्ष
पोलीस उपनिरीक्षक नीलेश गोसावी आपली साक्ष देताना म्हणाले की, १ सप्टेंबर रोजी लकडगंज पोलीस ठाण्यात ‘डे आॅफिसर’ म्हणून कर्तव्यावर असताना सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास ‘लँड लाईन’वर फोन आला होता. डॉ. चांडक बोलत असल्याचे फोन करणाऱ्याने म्हटले होते. माझा मुलगा युग हा ’किडनॅप’ झाला आहे, असे त्यांनी सांगितले होते. आपण त्वरित वरिष्ठांना माहिती दिली होती आणि ‘डीबी’ पथकाला बोलावले होते. त्यानंतर लागलीच डॉ. चांडक पोलीस ठाण्यात हजर झाले होते. माझा मुलगा युग याचे गुरुवंदन अपार्टमेंट येथून अपहरण झाले आहे, अशी तक्रार त्यांनी नोंदवली होती. तक्रारीवरून भादंविच्या ३६३ कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुरुवंदन सोसायटीचा चौकीदार अरुण मेश्राम याने घटनास्थळ दाखविले होते, असेही त्यांनी आपल्या साक्षीत सांगितले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय, अॅड. प्रमोद उपाध्याय आणि अॅड. जयश्री वासनिक यांनी काम पाहिले.