उपराजधानीत घडले केजरीवाल
By Admin | Updated: February 11, 2015 02:19 IST2015-02-11T02:19:42+5:302015-02-11T02:19:42+5:30
नागपुरात मिळालेल्या संस्कारांवर चालत ते ‘आयकॉन’ झाले व पुढेदेखील यावरच मार्गक्रमण करत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

उपराजधानीत घडले केजरीवाल
प्रशासकीय संस्कार झाले: शहराशी जवळचे नाते
नागपूर : नागपुरात मिळालेल्या संस्कारांवर चालत ते ‘आयकॉन’ झाले व पुढेदेखील यावरच मार्गक्रमण करत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवी दिल्लीत भाजपा, कॉंग्रेसच्या मोठमोठ्या दिग्गजांची फौज असताना, केजरीवाल यांच्या ‘टीम’ने एकहाती व जवळपास ‘क्लीन स्वीप’ असलेला विजय मिळविला अन् ‘आम आदमी’ प्रमाणेच नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीशी जुळलेल्या आजी व माजी लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला. मंगळवारी केजरीवाल यांच्या नेतृत्वात ‘आप’ने दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविला. यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये जाऊन त्यांच्याशी जुळलेल्या येथील जुन्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अकादमीमध्ये गत २१ वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांनी केजरीवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरक्षा रक्षकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. (प्रतिनिधी)
समाजभावनेतून सुरू केलेली समाजसेवा
केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे नागरिकांमध्ये आकर्षण आहे. त्यांच्यातील समाजसेवकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवातदेखील नागपुरातच झाली. प्रशिक्षणार्थी सहकाऱ्यांचे जुने वापरलेले कपडे ते गोळा करायचे. अनेकांना याचे आश्चर्य वाटायचे. हे कपडे ते काटोल मार्गावरील मदर टेरेसा आश्रमाला द्यायचे. शिवाय अकादमीमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
खोली क्रमांक १६ अन् केजरीवाल
भारतीय महसूल सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर केजरीवाल १९९४-९५ या दरम्यान प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी नागपुरातील छिंदवाडा मार्गावरील प्रत्यक्ष कर अकादमी येथे आले होते. यावेळी त्यांचा मुक्काम अकादमीतीलच ‘नालंदा’ वसतिगृहाच्या खोली क्र.१६ मध्ये होता. या खोलीमध्ये केजरीवाल यांनी देशाची अर्थव्यवस्था, करव्यवस्था अन् समाजाशी जुळलेल्या विविध मुद्यांबाबत वाचन केले. एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायचीच ही त्यांची जिद्द असायची. एखादा मुद्दा सखोल जाणून घ्यायचा असेल तर ते तहानभूक हरवून वाचत बसत. तब्बल दीड वर्षे येथे राहून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. ते ४७ व्या बॅचचे प्रशिक्षणार्थी होते. विशेष म्हणजे, याच काळात अकादमीमध्ये त्यांची बॅचमेट असलेल्या सुनीता या प्रशिक्षणार्थी तरुणीशी त्यांची मैत्री जुळली आणि नंतर त्या सौ. सुनीता केजरीवाल झाल्या. अशाप्रकारे केजरीवाल यांचे नागपूरशी एक आगळेवेगळे नाते आहे.
सहा वर्षांपूर्वी नागपुरात लेक्चर!
केजरीवाल यांनी १९९४-९५ मध्ये येथील प्रशिक्षण पूर्ण करून परत गेले. मात्र त्यांच्या मनात अकादमीविषयी निर्माण झालेल्या प्रेमाने त्यांना गत सहा वर्षांपूर्वी पुन्हा येथे खेचून आणले. पाच वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल अकादमीमधील नवीन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात आले होते. यावेळी अकादमीमधील वैशाली गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस मुक्काम केला होता.