अंकिता देशकर
नागपूर : प्रेम म्हणजे काेणतीही अपेक्षा न ठेवता, इच्छेने, मुक्तपणे मिळालेली भेट हाेय, असे डाॅ. लव्ह म्हणून ओळख असलेले लेखक फेलिस लिओनार्डाे सांगून गेला. आज संपूर्ण जग व्हॅलेन्टाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा करीत आहे. नागपूरची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे व तिचे पती अरुण विष्णू यांनीही लाेकमतशी बाेलताना बॅडमिंटन काेर्टवर बहरलेल्या त्यांच्या प्रेमाची कबुली दिली.
अरुंधतीने २००६ मध्ये बॅडमिंटन अकॅडमी जाॅईन केली तर अरुणने २००७ मध्ये. त्यावेळी फार ओळख नव्हती पण हळूहळू त्यांच्या मैत्री वाढली. मात्र २०१० मध्ये आशियाइ खेळांच्या वेळी त्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अरुंधती सांगते, त्यावेळी आम्हाला दाेघांनाही ते क्लिक झाले हाेते. म्हणूनच तेव्हापासून आम्ही एकत्र आहाेत. मात्र चित्रपटात दाखवितात तसे बॅडमिंटन काेर्टवर प्रपाेज वगैरे झाले नाही, हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. “आम्ही दाेघे समंजस हाेताे पण काहीतरी शिजत आहे, हे आम्हाला समजले हाेते. मात्र सुरुवात काेण करणार हा प्रश्न हाेता कारण अरुणही थाेडा लाजराच आहे. पण शेवटी स्वत:ला मॅनेज करून त्याने मनातील भावना बाेलली.” अरुंधती म्हणते, खरतर ही माझ्यासाठीही भेटच हाेती. २०१६ मध्ये या दाेघांनी नागपुरात लग्न केले.
एकाच क्षेत्रातील दाेघांमध्ये प्रेम हाेणे ही सहज गाेष्ट आहे आणि लग्न हाेणे हेही एक आव्हानच आहे. मात्र एकमेकांना समजून सहकार्य करण्याच्या दाेघांच्याही स्वभावामुळे हा प्रवास कठीण नसल्याचे ती सांगते. व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याच्या प्लॅनबाबत विचारले असता शेजारीच बसलेल्या अरुणला हास्य आवरले नाही. अरुंधतीने सांगितले, दाेन महिन्यापूर्वी त्याने एक गिफ्ट दिले आणि हे व्हॅलेन्टाईन डेची भेट असल्याचे सांगितले. नुकतेच हे जाेडपे मालदीववरून लग्नाचा वाढदिवस साजरा करून परतले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही बाहेर राेमांटिक डीनर करणार असल्याचे अरुंधतीने सांगितले. अरुणने आता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अरुंधतीला अजूनही खेळायचे आहे. मात्र या जाेडप्याला भविष्यातील खेळाडू घडवायचे आहेत. येणारी पिढी आमच्यापेक्षाही पुढे जावी, यासाठी आमचे प्रयत्न असल्याची भावना दाेघांनीही व्यक्त केली.