कलावंत मोहन जोशी : ड्रायव्हर ते अभिनेता
By Admin | Updated: September 10, 2014 00:49 IST2014-09-10T00:49:39+5:302014-09-10T00:49:39+5:30
लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यावेळी वडिलांनी नाटकात काम करण्याची परवानगी दिली. याच क्षेत्रात भविष्य करेन, असे मलाही वाटले नव्हते.

कलावंत मोहन जोशी : ड्रायव्हर ते अभिनेता
कलादालन फाऊंडेशन : हेल्पिंग पीपलतर्फे प्रकट मुलाखत
नागपूर : लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यावेळी वडिलांनी नाटकात काम करण्याची परवानगी दिली. याच क्षेत्रात भविष्य करेन, असे मलाही वाटले नव्हते. तसे ठरविले नव्हते पण नाटकात काम करण्याचा प्रारंभ १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून झाला. नाटक सुरू असताना माझे वाणिज्य पदवीपर्यंतचे शिक्षणही नापास न होता झाले. खूप संघर्ष करावा लागला, असे मला वाटत नाही आणि मी मानतही नाही. बरेवाईट अनुभव प्रत्येकालाच त्याच्या कामात येतात तसेच मलाही आले. काही काळ ड्रायव्हर म्हणून काम केले आणि नंतर या क्षेत्रात स्थिरावलो, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपला प्रवास उलगडला.
कलादालन फाऊंडेशन आणि हेल्पिंग पीपलच्यावतीने ‘जीवन से ना हार तू जिनेवाले’ या संकल्पनेवर मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत आणि जीवनविषयक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागलो. पण नाटकाच्या दौऱ्यांसाठी सुट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येकवेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस माझ्या चुकीने व्यवस्थापकाजवळ माझे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. पण नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन ड्रायव्हर झालो. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. अभिनयाच्या क्षेत्रात कुणी गॉडफॉदर नव्हता. माझा पहिलाच मराठी सिनेमा ‘एक डाव भुताचा’ त्यात मला खलनायकाची भूमिका मिळाली. त्यात अभिनेत्री रंजना होत्या. रंजना यांनी अनोळखी खलनायकाला हात लावू देणार नाही, असे सांगितले. मी नवा असल्याने मला सारे ऐकून घ्यावे लागले. हिरो म्हणून काम का केले नाही? असे विचारले असता त्यांनी ‘मी रोज माझा चेहरा आरशात पाहतो’, असे गमतीने उत्तर दिले. पण चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करतो, असे सांगितले. इंडस्ट्रीत हल्ली कुटुंबासारखे वाटत नाही पण आम्ही आता वयाने वाढलो. त्यामुळे वागण्यात जरा फरकही पडतो, असे ते म्हणाले. त्यांची ही मुलाखत माधवी पांडे यांनी घेतली. या कार्यक्रमाची संकल्पना माधवी पांडे आणि मनीष गायकवाड यांची होती. (प्रतिनिधी)
मोठी माणसे तितकीच साधी
चित्रपट क्षेत्रात धर्मेन्द्र, अमिताभजी यांची नावे मोठी आहेत. माझ्या आईला धर्मेन्द्र खूप आवडतो. धरमजींसह सिनेमात काम करताना आईची आणि त्यांची भेट घालून दिली. माझी आईचे माहेरचे नाव भावे. ती नागपूरची. धर्मेन्द्र पंजाबचे. नागपुरी हिंदी आणि पंजाबी हिंदीची जुगलबंदी तब्बल दीड तास रंगली. धरमजींनी आईला नृत्यही करून दाखविले. एवढा मोठा कलावंत पण खूप सहजपणे वागला. यावेळी त्यांचे मोठेपण माझ्या लक्षात आले. तर एकदा माझे डबिंग झाल्यावर त्याच स्टूडिओत अमितजींचे डबिंग होते. त्यांच्यासोबतचा एक सिनेमा मी खलनायक म्हणून साईन केला होता. त्यावेळी सिनेमाच्या दिग्दर्शकाने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि पुढल्या सिनेमात हे खलनायक आहेत, असे त्यांना सांगितले. त्यावेळी अमितजींनी ‘हा हा आप के साथ काम करेंगे...’ त्यांनी असे उपरोधिकपणेच म्हटले, असे मला वाटले आणि मी खूप अस्वस्थ झालो. पण त्यानंतर अनेकांनी त्यांचा मोठेपणा सांगितला आणि मला हायसे वाटले. आता त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत, असे मोहन जोशी म्हणाले.
सुरेल संगीताचा कार्यक्रम
मुलाखतीनंतर सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात प्रमुख गायक सागर मधुमटकेने आपल्या खास अंदाजाने रसिकांची दाद घेतली. बहुतेक किशोरदांची गीते सादर करताना सागरने अनेक गीतात बांगला भाषेचा उपयोग बेमालूमपणे केल्याने रसिकांनी त्याला विशेष दाद दिली. याप्रसंगी सागर, मयंक लखोटिया, अनुजा मेंघळ, श्रद्धा घरोटे यांनी गीते सादर केलीत. संगीत संयोजन मंगेश पटले, राजा राठोड, श्रद्धा घरोटे, श्रीकांत सूर्यवंशी, नंदू गोहाणे यांचे होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी किसन पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जयंत तुपे, टी. के. मन्ना, दिघे, कडू, अमोल सातफळे, रामराव कुंभारे यांचा सत्कार करण्यात आला.