बालाजी देवर्जनकर मुख्य उपसंपादक, नागपूर
सौर ऊर्जेवर कपाशीचे ठिबक सिंचन, प्राथमिक उपआरोग्य केंद्रात गावातील रुग्णांवर दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार. यासाठी लागणाऱ्या ‘फाइव्ह जी’चा टॉवर गावातच सन्मानाने उभा झाला आहे. प्राथमिक शाळेतील मुलं आता स्क्रीनवर विज्ञान-गणिताशी मैत्री करणार आहेत. शेतकऱ्यांना बसल्याजागी मोबाइलवर हवामानासह बाजारभाव कळणार आहेत. असे एक ना अनेक बदल सातनवरी अनुभवणार आहे. गाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात धुळीने माखलेले रस्ते, उन्हात काम करणारे शेतकरी... पण सातनवरीनं ही प्रतिमा कायमचीच पुसायला सुरुवात केली आहे.
गावात शिरताच जाणवतो तो सर्वांच्या चेहऱ्यावरील उत्साह. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमुळे वाय-फाय, फायबर-टू-द-होम, सॅटेलाइटमुळे ग्रामपंचायतीपासून घरोघरी ब्रॉडबँडचा विस्तार होत आहे. शाळेत प्रोजेक्टर लागताहेत, सौरचे स्ट्रीट लाइट, एवढंच काय शेतात ड्रोनही उडत आहे. २४ कंपन्या इथे सेवा देत आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक महामुनी हे अधिकारी परिश्रम घेत आहेत. नारायण खरे हे गृहस्थ सांगत हाेते, आता सगळं बदलतंय हो. बदल होतोय; पण खरी क्रांती मनातील आहे.
सातनवरीत नेमका बदल झाला तरी काय?
१) शेतीत नवे मार्ग
पूर्वी खतं फवारण्यासाठी तासन्तास उन्हात फिरावं लागायचं. आता काही मिनिटातच ड्रोनने फवारणी पूर्ण होते. मातीही सेन्सरच तपासते, पाण्याचं रिअल टाइम नियोजन केलं जातंय. तरुण सुशांत तिमाने सांगतो, आता खतं फवारायला फिरायची गरजच नाही. ड्रोन उडतो आणि काही मिनिटांत काम संपतं. आगीच्या आपत्कालीन स्थितीतही हे ड्रोन काम करेल. स्मार्ट गोवंश निरीक्षण यंत्रणाही इथे उपलब्ध होतेय.
२) अर्थकारण गावातच
पूर्वी छोट्या-छोट्या व्यवहारासाठी तालुक्याला धाव घ्यावी लागायची. आज ‘बँक ऑन व्हील्स’ गावात येतेय. मोबाइल बँकिंग लोकप्रिय आहे.
३) शिक्षण ऑनलाइन
गावातील शाळेत प्रोजेक्टर लागणार आहेत. त्यामुळं ऑनलाइन धडे मिळतील. अजून खूप काही करायचंय. सरपंच वैैशाली चौधरी सांगत होत्या, आता आमच्या विद्यार्थ्यांना शहरातल्या मुलांसारखंच शिकायला मिळेल. अजून सुविधा वाढतील, प्रयोग होतील. पालक सांगतात की, आता मुलं पुस्तकापुरती अडकणार नाहीत. अभ्यास स्क्रीनवर, ॲप्सवर, खेळकर पद्धतीनं होईल.
४) डॉक्टर मोबाइलवर
पूर्वी साधा ताप आला तरी तालुक्याला जावं लागायचं. आता टेलिमेडिसिनमुळं मोबाइलवर डॉक्टरांचा सल्ला मिळतोय, औषधांची यादी मिळतेय. इथेच इसीजी निघेल, बीपी तपासला जाईल. शरीराची पूर्ण तपासणी होईल. अत्याधुनिक यंत्र दाखल झाली आहेत. प्रभाकर गोतमारे म्हणाले, संगणकावरून व्हिडीओ कॉल केला की नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टर सल्ला देतात.
५) सुरक्षितता
गावभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. त्यामुळे गावाची सुरक्षा होतेय. स्मार्ट स्ट्रीट लायटिंग केली जात आहे. जी सभोवतालच्या प्रकाशावर आधारित प्रखरता नियंत्रित करतील.
इतर गावांच्या अनास्थेचं वास्तव
आज महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत, जिथं अजूनही रस्त्यांवर चिखलात पाय रुततात, तर पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल चालावं लागतं. शाळा आहेत; पण शिक्षक नाहीत, आरोग्य केंद्र आहेत; पण औषधं नाहीत. ग्रामपंचायतीत निधी असतो; पण तो कधी रस्त्यांत, कधी सभागृहांत, कधी अपूर्ण प्रकल्पांत अडकून बसतो. ठेकेदारी पुढारपण मिरविणाऱ्यांचीच असते. गावात रोजगार निर्माण करणं तर दूरच, उलट तरुणाईला ‘शहर गाठा’ असं सांगितलं जातं. परिणामी, गावं रिकामी होतायत. मग, सातनवरीसारखा बदल प्रत्येक गावाने का करू नये? सातनवरीत जशी ‘सगळे मिळून’ अशी भूमिका घेतली गेली, ती अनेक गावांत दिसायला हवी.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
ग्रामविकासाच्या दृष्टीनं भारतातील एक अभूतपूर्व अध्याय नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावापासून सुरू झालाय. उच्चतंत्रज्ञावार आधारित शेती, शिक्षण, टेलिमेडिसीनपर्यंतची लोकसहभागासह सक्षम स्टेकहोल्डरशिप इंटेलिजंट गावाच्या रूपात आकार घेते आहे, याचा खूप आनंद आहे.
नागपूर जिल्हा परिषद सीईओची प्रतिक्रिया
बदल एकदाच होत नाही. तो टप्प्याटप्प्याने घडतो, लोकांच्या विचारांत रुजतो आणि गावाला नवा चेहरा देतो. सातनवरी अजून बदलतंय, अजून शिकतंय, अजून उभारतंय. परगावचे लोक येऊन विचारतील. तुमच्या सातनवरीचं रहस्य आहे तरी काय?, असे नागपूर जिल्हा परिषदेचे डॉ. विनायक महामुनी म्हणाले.