Arrested contract workers of Mahavitaran for bribing | महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक
महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

ठळक मुद्दे भिवापूरच्या शेतकऱ्याला मागितली लाच

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. आरोपीत कंत्राटी लाईनमन प्रीतम गौतम लोखंडे (२५) आणि शुभम पुंडलिक हिंगे (२५) यांचा समावेश आहे. तक्रारकर्ता भिवापूर तालुक्याच्या वीरखंडी धार्पला गावातील शेतकरी आहे. त्यांच्या वडिलांच्या नावाने दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेतात विहीर असल्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी विजेच्या मीटरची गरज होती. त्यासाठी त्यांनी अर्ज केल्यानंतर डिमांड नोटचे ५ हजार ७४८ रुपये भरले होते. त्यानंतरही विजेचे मीटर लावण्यात आले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याला थेट खांबावरून कनेक्शन घेतल्यामुळे कारवाई न करण्यासाठी ४ हजाराची लाच मागितली होती. परंतु शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नव्हती. अखेर शेतकऱ्याने नागपूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात निरीक्षक विनोद आडे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून शनिवारी १४ डिसेंबरला आरोपींना पकडण्याची योजना आखली. आरोपींशी चर्चा करून ३ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर एसीबीच्या चमूने भिवापुरला आरोपींना बोलावून रक्कम घेताना अटक केली. ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद आडे, हवालदार अशोक बैस, अनिल बहिरे, वंदना नगरारे, शारीक शेख यांनी केली.

Web Title: Arrested contract workers of Mahavitaran for bribing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.